खटाव : पडळ (ता.खटाव ) येथील के.एम.शुगर साखर कारखान्यातील अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे मात्र माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचेवर दाखल असणाऱ्या गुन्ह्याचा फेरविचार करून त्यांचे नाव कमी करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याना देण्यात आलेल्या निवेदनात गेल्या पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ खटाव तालुक्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माजी आमदार घार्गे यानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून तळागाळातील शेतकऱ्याना समृद्ध करण्याचे काम केले आहे. तर आपल्या आमदार फंडातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्या सुरू करून पशुधन वाचवण्याचे महान कार्य केले आहे. आपल्या मितभाषी स्वभावामुळे सर्वाना ते आपलेसे वाटतात.त्यामुळेच सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर त्यांची सांगली -सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर व जिल्हा बँकेच्या संचालक पदी दोन वेळा बिनविरोध वर्णी लागली आहे. सदैव जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या आमदार घार्गे यांचा खुणासारख्या घटनेत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असूच शकत नाही. त्यामुळे या खून प्रकरणाच्या घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी करावी व दोषींवर कारवाई व्हावी मात्र साप -साप म्हणून भुई धोपटून निरापराध व्यक्तीवर कारवाई करू नये असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर नगरसेवक शहाजीराजे गोडसे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, सुशांत पार्लेकर, मधुकर मोहिते, आबासहरब भोसले, सागर गोडसे, लालासाहेब गोडसे, गणेश चव्हाण, विनोद चौधरी, विजय कांबळे, आतुल करांडे आदींच्या सह्या आहेत.
१० मार्चला थोरात यांना मारहाण झाल्याची घटना घडली, त्याच दिवशी दुपारपर्यंत माजी आमदार प्रभाकर घार्गे हे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी वडूज पंचायत समिती हॉलमध्ये पत्रकार परिषद उपस्थित होते. व संध्याकाळपर्यंत माजी आमदार प्रभाकर घार्गे पंचायत समितीमध्येच होते. त्यामुळे ते त्या ठिकाणी होते की नाही हा संशोधनाचा विषय आहे. तसेच आमदार प्रभाकर घाडगे यांची व्यक्तीश:, सामाजिक व राजकीय प्रवासात कधीही वाद, तंटा भांडण अशा कोणत्याही भानगडीत न पडणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे, अशा पद्धतीची चरित्र असलेल्या व्यक्तीला फक्त त्या कारखान्याचे चेअरमन आहेत, म्हणून या प्रकरणात त्यांना ओढण्यात येत आहे की काय ? अशी शंका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.






















