पाटण : पाटण तालुक्यात सध्या दररोजची कोरोना बाधितांची संख्या शंभरीच्या पटीत असल्याने त्या प्रमाणात बेडची उपलब्धता असणे गरजेचे आहे. बाधित रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी जिथे जिथे बेडची संख्या वाढवता येईल तिथे ती वाढवावी. तालुक्यात एकही व्हेंटीलेटर नसावा ही दुर्दैवाची बाब आहे. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी जी मदत लागेल ती तात्काळ देवू, असे आश्वासन आ. शशिकांत शिंदे यांनी आढावा बैठकीत बोलताना दिले.येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सत्यजिसिंह पाटणकर, तहसीदार योगेश्वर टोंपे, कराडचे उपविभागीय अधिकारी डॉ. रणजित पाटील, सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही. बी. विभूते, सपोनि नितीन चौखंडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आ. शिंदे यांनी पाटण तालुक्यातील बाधित रुग्ण संख्या, उपलब्ध बेड, होम आयसोलेशनमधील रुग्ण व त्यांची व्यवस्था याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील व ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. कुराडे यांच्याकडून माहिती घेतली. तसेच पाटण, मरळी व ढेबेवाडी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये आवश्यकतेनुसार ऑक्सिजन बेड वाढवण्याबरोबरच इतर सुविधांंसह रुग्णांसाठी शुध्द पाणी व स्वच्छता ठेवावी. ज्या ज्याठिकाणी व्हेंटीलेटर शक्य आहे ते ते बसवून फिजिशियनची मागणी करावी. कोरोना बाधितांची वाढती मागणी लक्षात घेता खाजगी डॉक्टरांची मदत घ्या. बाहेरून तालुक्यात येणाऱ्यांना विलगीकरण करून संशयितांची कोविड टेस्ट करा. होम आयसोलेशनमधील बाधित रुग्ण मोटाक बाहेर फिरणार नाहीत याची दक्षता घ्या, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.तालुक्यात लसीकरण चांगल्या पध्दतीने सुरू आहे. ऑक्सिजन बेडची संख्याही वाढवणार असून तालुक्यातला जास्तीत जास्त कोविड लस मिळावी यासाठी मागणी केली असल्याचे तहसीलदार योगेश्वर टोंमे यांनी सांगितले. तर तालुक्यात घर टू घर अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यामार्फत सर्वे चालू आहे. संशयास्पद व्यक्तीची तात्काळ कोविड टेस्टही केली जात असल्याचे गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी सांगितले.याप्रसंगी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, पाटण तालुका हा दुर्गम व डोंगराळ असला तरी याठिकाणी गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोविड काळात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतानाही अधिकारी चांगली परिस्थिती हाताळत आहेत. महसूल विभाग, वैद्यकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा झोकून देवून काम करत आहेत. तालुक्यातील पाटण, मरळी, ढेबेवाडी येथील कोरोना केअर सेंटरसाठी लागणारी साधनसामुग्री जास्तीत जास्त मिळावी, अशी मागणी सत्यजितसिंह पाटणकर यांनी केली.आढावा बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत असल्याने वारंवार वीज खंडीत होत आहे. यामुळे बाधित रुग्णांसाठीच्या ऑक्सिजन पुरवठ्यात बाधा येवू नये यासाठी येथे तातडीने जनरेटर मिळावे. तसेच तालुक्यातील रुग्णांची संख्या पाहता केवळ 2 ऍम्ब्युलन्स असून त्याही अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे रुग्णांची ने-आण करताना अडचणी होती. त्यासाठी ऍम्ब्युलन्स आवश्यक असल्याचे सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले. यावर आ. शशिकांत शिंदे यांनी तात्काळ दखल घेत बैठकीतच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना फोन लावून जनरेटर व ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची सूचना केली.




















