सातारा :
मराठी पत्रकार परिषद येत्या 3 डिसेंबर 2020 रोजी 82 व्या वर्षात पदार्पण करत आहे. सध्या कोरोना सारख्या भंयकर परिस्थितीतून सर्वजण जात आहे. कोरोनाची बिकट स्थिती असतानाही राज्यातील पत्रकार मागे हटले नाहीत. दोन दिवसांनी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन असल्याने राज्यात आरोग्य शिबीर घेतली जाणार असून पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने तालुकास्तरावर आरोग्य शिबीर घेण्याचे आयोजन केले जात आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व विश्वस्त किरण नाईक यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्याच्या पदाधिकार्यांना तालुका पातळीवर आरोग्य शिबिर घेण्याचे आवाहन केले आहे.
मराठी पत्रकार परिषद गेल्या अनेक वर्षांपासून आलेल्या प्रत्येक संकटावर यशस्वी मात करत आहे. आता परिषदेची 100 वर्षाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी राज्यात ठिकठिकाणी पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. या वर्षी 3 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्यावतीने पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. आपली तालुका संघटना ही मराठी पत्रकार परिषदेशी जोडली गेल्यामुळे आपण आपल्या कार्यक्षेत्रातील पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करावे. यासाठी स्थानिक डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्य घ्यावे. आरोग्य शिबीर राबवताना गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच प्रत्येकाने मास्क वापरुन फिजीकल डिस्टन्सींग पाळावे. आरोग्य शिबीरासाठी दोन दिवसांचा अवधी असल्याने त्यासाठी नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ देखील आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील तालुका पातळीवर हे आरोग्य शिबीर नेटक्या नियोजनात पार पाडावे, असे आवाहन सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी केले आहे.