सातारा : देवदूत फौंडेशनच्या माध्यमातून सातारा शहर व परिसरातील कातकरी समाजातील नागरिकांना मोफत अन्नदान करण्यात आले. देवदूत फौंडेशनच्या माध्यमातून दररोज समाजातील उपेक्षित वंचित घटकांना मोफत अन्नदान करण्यात येते.याबाबत सविस्तर माहिती अशी, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात आणि पर्यायाने सातार्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनमुळे सातारा एका जागेवरच थिजला आहे. यामुळे लोकांच्या हाताला काम नाही, पोटाची आबाळ होत आहे. घराबाहेर पडायचे झाले तर खाकी वर्दीची दहशत आहेच. त्यामुळे उपासमारीशिवाय या लोकांपुढे पर्यायच उरत नाही. या सर्व बाबींचा विचार करुन सातार्यातील सामाजिक संघटनांनी एकत्र येत अन्नदानाचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने दररोज जवळपास शंभर ते दीडशे लोकांना अन्नदान करण्यात येते.
या संघटना विविध कोविड रुग्णालये, शहर परिसरातील अनेक उपेक्षित वाड्या-वस्त्या, हाताला काम नसणार्या बेरोजगारांचे तांडे यांच्याकडे स्वत: जावून तेथे मोफत अन्नदानाचे कार्य करीत आहेत. कोविड रुग्णालयाबाहेर असणार्या कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनाही दररोज दोनवेळचे जेवण मिळत असल्याने त्यांनीही याबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे.या अन्नदानाच्या कार्यात देवदूत फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर, उपाध्यक्ष दिपेंती चिकणे, सातारा हॉकर्स संघटना शहराध्यक्ष संजय पवार, जिल्हाध्यक्ष सादीक पैलवान, सुनिता चिकणे, महेंद्र बाचल, दीपक शिंदे, महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेचे शहराध्यक्ष संदीप माने, अन्नपूर्णा मसाले च्या ऐश्वर्या प्रभुणे, संतोष प्रभुणे, दीपक गडकरी, राहुल बहुलेकर, कुलदीप भोगांवकर, शंकर गावडे, सारिका भोगांवकर, वंदना पवार, प्राची कदम, सागर पवार हे परिश्रम घेत आहेत.देवदूत फौंडेशनच्या या उपक्रमाचे शहर आणि परिसरातील मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे.