कराड : कृष्णा कारखान्याची निवडणूक ही धनिका विरोधात श्रमिकांच्या संघर्षाची किनार असलेली आहे. या संघर्षात स्वतःला कंत्राटदार आणि कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना मजूर, वेठबिगार समजणाऱ्या साडूबंधू असलेल्या भोसले- मोहिते डॉक्टर जोडगोळीस सभासदांनी मतपेटीद्वारे कृष्णा कारखान्यातून कायमचे हद्दपार करावे असे आवाहन कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी संस्थापक पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिरसगाव, सोनकिर, आसद (ता. खानापूर) येथे सभासदांशी संवाद साधताना केले.
यावेळी संस्थापक पॅनलचे उमेदवार माणिकराव मोरे (देवराष्ट्रे), बाबासाहेब पाटील(येडेमच्छिंद), अधिकराव निकम(शेरे), भिमराव मांडके, सरपंच परशुराम मांडके( शिरसगाव), हणमंतराव नलवडे, शहाबुदीन मुजावर, सनी पाटील( सोनकिरे), भास्कर जाधव, संतोष माने(आसद) आदी मान्यवर उपस्थित होते.
मोहिते म्हणाले, डॉ. सुरेश भोसले यांना गेटकेनमधून मिळविलेल्या आणि डॉ. इंद्रजीत मोहिते यांना रिअल इस्टेटच्या धंद्यातून मिळविलेल्या पैशाची मस्ती आहे. वाममार्गाने मिळविलेल्या संपत्तीच्या जोरावर त्यांनी सभासदांना विकत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चार-दोन हजाराच्या लालसेपोटी सभासदांनी आपले मत विकू नये. तशी चुक जर यावेळी आपण केली, स्वाभिमान गहाण टाकला तर नात्याने साडूभाऊ असलेले भोसले-मोहिते कारखान्यात एकाधिकारशाही निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत.
“कारखान्याचे खासगीकरण करण्यासाठी नडणाऱ्या सहा हजार ऊस उत्पादक सभासदांना डॉ. सुरेश भोसले यांनी अक्रियशिल केले आहेत. संस्थापक पॅनेलकडे कारखान्याच्या सत्तेची सुत्रे येताच अक्रियाशील सभासदांना पुन्हा कारखान्याचे सभासद करून घेतले जाईल. २०१० ते २०१५ या काळात ज्या सुविधा दिल्या त्या पुन्हा सुरू केल्या जातील. एफआरपीपेक्षा ऊसास उचांकी दर दिला जाईल असे स्पष्ट करून कारखान्याचे खासगीकरण रोखण्यासाठी संस्थापक पॅनेलला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन अविनाश मोहिते यांनी यावेळी केले.
बझार, पतसंस्था बुडविणारांना जाब विचारा
डॉ. इंद्रजीत मोहिते हे सर्व बाजूंनी अपयश आलेले गृहस्थ आहेत. त्यांना स्वतःचा दवाखाना नीट चालविता आला नाही. स्व. भाऊ हे कारखान्याच्या संस्थापकापैकी एक होते. कारखान्यास भाऊंचे नाव असल्यामुळे डॉ. मोहिते यांना कृष्णा कारखाना ही आपली खासगी जहागिरी असल्याचा भ्रम निर्माण झाला असल्याचे सांगून,
यशवंत बझार आणि यशवंतराव मोहिते पत संस्थेतील ठेवी, भागभांवल बुडवून सभासदांना आर्थिक गंडा घालणारे डॉ. इंद्रजीत मोहिते हे मत मागायला आपल्या दारात आल्यानंतर दोन्ही संस्थांचे कोट्यावधी रुपये कुठे मुरविले? याचा जाब सभासदांनी त्यांना विचारायला हवा असेही अविनाश मोहिते म्हणाले.
यशवंतराव मोहिते पत संस्थेत ठेवी अडकलेल्या ठेवीदारानी सहकारी संस्था निबंधकांचा सल्ला घेवुन रितसर तक्रार करावी. शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे बुडविणार्या प्रवृतीस धडा शिकविण्यासाठी आपण शेतकऱ्यासोबत राहणार असल्याचे मोहिते यांनी यावेळी स्पष्ट केले.






















