सुसंस्कृत ,सभ्य आणि इतर कोणताही अन्वयार्थ निघणार नाही असे भाषण आणि लिखाण करा किंवा पोलीस स्टेशन ,न्यायालयाच्या फेर्या मारा, असा प्रघात पडणार आहे. या सगळ्यात ठाकरी नावाची राजकारणातली ब्रँडेड भाषा अस्तंगत जाण्याची दाट शक्यता आहे.
राजकीय वक्तव्यांचा घसरलेला स्तर हा आजचा विषय नाही. मात्र काल जेवढा गंभीर, संवेदनशील विषय होता तेवढाच किंबहुना माध्यमांच्या सहज उपलब्धतेमुळे तो आज अधिक गंभीर, संवेदनशील होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. राजकारण करणाऱ्या सगळ्याच पक्षातील नेत्यांन पासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनीच याचे भान ठेवले पाहिजे.मात्र ते ठेवताना दिसत नाही. बोलण्यात,वागण्यात विवेकाचे भान नसल्याने आणि केवळ राडा संस्कृतीचा नेते मंडळीच अनाठायी गौरव,अभिमान, स्टाईल, संस्कृती समजत असल्याने यापुढे राडा टिकून राहणार की काय असे वाटायला लागले होते.या संस्कृतीमुळे सर्वसामान्य जनताही वेठिला धरल्याचे अनुभव आहेत. परंतु परवाच्या , केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे यांच्या भाषा वापरावरून अटकेपर्यंत च्या प्रसंगामुळे या संस्कृतिला अटकाव होईल असे अंधुकसे का होईना वाटायला लागले आहे.
उपद्रवमूल्य एवढाच हेतू
नेते मंडळी अवधान,अनावधानाने तरुणांची माथी भडकवणारी विधाने करतात . यात दुमत असायचे कारण नाही. आपले स्वतःचे, आपल्या पक्षाचे राजकारण , आपली नेत्याबद्दलची निष्ठा, वरिष्ठांनी बद्दल असणारा( दाखवावा लागणारा ) आदर आणि कार्यकर्त्यांना कथित मार्गदर्शन व हाताला काम देण्याची जबाबदारी प्रत्येक पक्षातील भडकाभडकवी करणाऱ्या नेत्यावर असते. तो ती इमानदारीत पार पाडत असतो. भाषण किंवा वक्तव्य आणि लेखन यातून समाज अस्वस्थ, अस्थिर करण्याच्या हा प्रयत्न म्हणजे “आम्ही अजून जिवंत आहोत. आमचे उपद्रवमूल्य सर्वश्रेष्ठ असून , त्याचा वापर हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे” हे ठसवणे असू शकते. अर्थात हे मूल्य ठसवण्याची भाषा हे महत्त्वाचे माध्यम आहे. साधन आहे आणि असते.
ते बाळासाहेब होते
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भाषा हे शिवसेनेच्या भात्यातले अमोघ शस्त्र होते. त्यांची भाषण करताना, मुलाखत देतानाची देहबोली ,घणाघाती भाषाशैली, थेट भिडणारे आव्हानात्मक विचार आणि त्यांच्या भाषेला असलेला, तसेच त्यांना असलेला प्रचंड जनाधार या अफलातून मिश्रणातून त्यांनी प्रथम मराठी माणूस व नंतर हिंदुत्वाचा जागर केला. शिवसेना वाढवली.राज्यात रुजवली . बोललेले ,लिहिलेले शब्द आयुष्यात त्यांनी मागे घेतले नाहीत. विरोधकांमध्ये गांधी परिवार ,शरद पवार ,नारायण राणे या सगळ्यांना तसेच अनेकांना त्यांनी घायाळ होई पर्यंत शाब्दिक पंजांनी फटकारले. अगदी लक्तरे काढली .मात्र ते बाळासाहेब ठाकरे होते..! त्यांची भाषा सर्वमान्य, सर्वस्वीकृत होती. त्यामुळे ती ठाकरी भाषा आणि भाषा शैली होती. त्यांची भाषा इतर कोणालाही पेलवणारी नाही आणि तशी कोणी ती वापरली तर जनमानसात ती स्वीकारली ही जाणार नाही. आता राणे प्रकरणानंतर तर त्या भाषेची नक्कल करणाऱ्यांना फ्रिज मधले ताकही फुंकून प्यावे लागेल यात शंका नाही. ठाकरी भाषा ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर संपली . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात ती दिसते.त्यांना शोभते. स्व.बाळासाहेबांच्या भाषेची नक्कल करत दुकानदारी करणाऱ्यांनी आता सावध रहावे.तसे करणाऱ्यांची आता दुकानदारी ही राणे प्रकरणा नंतर नक्कीच संपेल. लेख ,अग्रलेख आणि भाषणांमुळे कोणाच्या भावना किती प्रमाणात दुखावल्या जातील याचा पत्ता यापुढे पोलीस ठाण्यात झालेल्या तक्रारीच्या संख्येवरून समजेल. तक्रारी ,त्यानंतर थेट अटक ही वाट आता या पुढे इतर सत्तारूढ पक्षही अवलंबतील .ती आता वहिवाट ही होईल.
वाईटातून चांगले
राजकारणात सुसंस्कृतपणा असणे आवश्यक आहे. तो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. हे पण वास्तव आहे. अशातच राणे प्रकरणामुळे भले शिवसेनेची सरशी झाली, असे वाटत असले तरी हे दुधारी हत्यार आहे .आणि आता अशा प्रकरणांना इतर पक्षातील कार्यकर्ते, नेतेही हे उदाहरण कुरघोडी करण्याकरता वापरतील यात शंका नाही . राणे प्रकरणानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जठार यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज आणि नारायण राणे यांची तुलना केल्यामुळे तक्रारी दाखल करण्यात आल्या.असे प्रकार नक्की वाढतील. आता हा विषय गल्लीपर्यंत ही येऊ शकतो . यामुळे एकतर सुसंस्कृत ,सभ्य आणि इतर कोणताही अन्वयार्थ निघणार नाही असे भाषण आणि लिखाण करा किंवा पोलीस स्टेशन ,न्यायालयाच्या फेर्या मारा, असा प्रघात पडणार आहे. या सगळ्यात ठाकरी नावाची राजकारणातली ब्रँडेड भाषा अस्तंगत जाण्याची दाट शक्यता आहे. राणे प्रकरणा सारख्या घटना वारंवार घडू लागल्या तर ती लवकरच नाहीशी होईल .भाषेच्या वापराने सत्ता मिळवणे शक्य असते किंबहुना आपल्या वक्तृत्व आणि भाषणांनी जगभरात सत्ता मिळवल्याची आणि युद्ध जिंकल्याची उदाहरणे आहेत. मात्र आज ; आता यापुढे या भाषेवरच सत्ता नियंत्रण ठेवणार असे दिसायला लागले आहे .सुसंस्कृत राजकारण यापुढे होणार असेल, भाषा योग्य पद्धतीने वापरली जाणार असेल तर हे सगळे प्रकरण राजकीयदृष्ट्या वाईटातून चांगले होण्यासाठीच नियतीने घडवले असे म्हणावे लागेल.
.
मधुसूदन पतकी
































