बारामती परिसरातील विकासकामे वेळेत पूर्ण करा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
बारामती : बारामती परिसरातील विकासकामांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्या आणि सर्व कामे वेळेत पूर्ण करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करताना दिले.
श्री.पवार यांनी आज कऱ्हा नदी सुशोभिकरण प्रकल्पातंर्गत दशक्रिया विधी घाट, एसटी स्टॅन्डचे नवीन बांधकाम व परकाळे बंगला येथील कॅनलवरील सुशोभिकरण कामाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर आदी उपस्थित होते.
विकास कामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सर्व विभागांनी विकास कामे समन्वयाने पार पाडावीत. निधीचा योग्य पद्धतीने वापर करावा. निधीची आवश्यकता असल्यास संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करावेत. सार्वजनिक कामे चांगली व वेळेत होण अपेक्षित आहेत. अपूर्ण कामांबाबत संबंधित विभागाने माहिती घेऊन ती वेळेवर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा. शहरातील रस्त्यावरील खड्डे लवकर भरुन घ्यावेत. सर्वच विभागानी जबाबदारी स्वीकारून कामे करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, गटनेता सचिन सातव, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अनिल बागल, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपअभियंता राहूल पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आदी उपस्थित होते.
नगरपरिषद इमारतीवरील सोलर प्रकल्पाचे उद्घाटन
जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 अंतर्गत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अपारंपारिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत बारामती नगर परिषद इमारत येथे आस्थापित केलेल्या सौर विद्युत संचाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पौर्णिमा तावरे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, सभापती बांधकाम समिती सत्यवान काळे, नगरपरिषदेचे सदस्य, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, , तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.
या सोलर प्रकल्पात एकूण १७९ पॅनल असून त्याची क्षमता ६० के.व्हीची आहे.
हा एक चांगला प्रकल्प असून या प्रकल्पामुळे वीज बील कमी येण्यास मदत होईल. नगररिषद इमारतीत स्वच्छता असायला हवी. परिसर सुंदर आणि निट नेटका दिसला पाहिजे. परिसरात अनधिकृत होर्डिग असल्यास काढून टाकावीत, असेही ते यावेळी म्हणाले.
हा प्रकल्प पुर्णत्वाकडे नेण्यासाठी सहकार्य केलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.