बारामती : सोमेश्वरनगर, ता.बारामती येथील सोमेश्वर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना पडलेले १९ हजार रुपयांचे पाकीट एकाने प्रामाणिकपणे परत करत माणुसकी अजूनही शिल्लक असल्याचे दाखवून दिले.
वडगाव निंबाळकर येथील तानाजी दामोदर गायकवाड यांचे शेतात माती ओढायचे काम सुरू होते. काम करणाऱ्या जेसीबी मालकाला पैसे देण्यासाठी गायकवाड यांनी एका मित्राकडून १९ हजार रुपये उसनवारी घेतले व सोमेश्वरनगर येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना त्यांचे हे पाकीट पंपात पडले.
ते पाकीट दादा पाटोळे (शेंडकरवाडी) व राजाभाऊ पाटोळे(मूळ बीड, सध्या रा. निंबुत छप्री) या दोघांना सापडले. यावर दोघांनीही हे पाकीट कुणाचे आहे, अशी चौकशी केली. मात्र कोणीही माझे पाकीट आहे असे म्हटले नाही. यावर ते दोघेही घरी निघून गेले. पाकीट हरवल्या मुळे गायकवाड हे चलबिचल झाले. गायकवाड हे पेट्रोल पंप अधिकारी दत्ता माळशिकारे यांच्याकडे गेले. माझे पैशांचे पाकीट पडले आणि ते कुणीतरी नेले म्हणत ढसाढसा रडले. दत्ता माळशिकारे यांनी तातडीने करंजेपुल चौकीतील पोलिसांना ही कल्पना दिली. पोलिसांनी तातडीने पंपावरील सीसीटीव्ही फुटेज काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. सोमेश्वरनगर परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. हे सर्व करत असतानाच ज्यांना हे पाकीट सापडले आहे त्यांनी स्वतः होऊन ते पोलीस ठाण्यात आणून दिले.
यासाठी पोलिसांना रामराजे राजवडे यांनी सहकार्य केले. गुरुवारी(दि.३०) रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, उपनिरीक्षक योगेश शेलार, दत्ता माळशिकारे, स्थानिक पत्रकार यांच्या उपस्थितीत ही रक्कम संबंधितांना देण्यात आली. रक्कम मिळाल्याने गायकवाड यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहिला नाही.