फलटण : श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ बिगर शेती सहकारी पतसंस्था कोळकी ,(फलटण) या पतसंस्थेच्या झालेल्या आर्थिक घोटाळ्यात संचालक मंडळांची / वैयक्तिक संचालकांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी साताऱ्यातील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केलेल्या दप्तराची/ कागदपत्रांची मागणी सहाय्यक निबंधक फलटण यांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडेमागणी केली आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर ते प्रकरण सातारा येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या एका आदेशानुसार प्रत्येक संचालकाची जबाबदारी निश्चित करण्या संदर्भातील पत्र सहाय्यक निबंधक, फलटण यांना देण्यात आलेले आहे. तसेच उच्च न्यायालयामध्ये प्रत्येक संचालकाची जबाबदारी निश्चित करण्याबाबत न्यायालयाने मागणी केल्याने सातारा येथील विधिज्ञ निकम यांची प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. निकम यांना जबाबदारी निश्चित करण्यासाठी पतसंस्थेच्या दप्तराची आवश्यकता आहे.
त्यातील एक कारण म्हणजे या संचालक मंडळामध्ये असणाऱ्या एका महिला संचालकांनी असे सांगितले आहे की, मला या संदर्भातील काही माहिती नाही. वस्तविक संचालक या नात्याने ते या प्रकरणाची जबाबदारी नाकारू शकत नाहीत. त्यासाठी प्रत्येक जण संचालकाची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याने व न्यायालयीन कामकाज साठी ते निश्चित करणे गरजेचे असल्याने सहनिबंधक फलटण यांनी चिंतामणी पतसंस्थेच्या जप्त केलेल्या दप्तराची मागणी केली आहे. न्यायालयामध्ये दावे दाखल असताना त्यासाठी पूरक अशा बाबींची पूर्तता करण्याची समांतर काम जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे चालू आहे. जबाबदारी निश्चित झाल्यानंतर उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या दाव्यांमध्ये संचालकांचा अंतरिम जामीन पुढे चालू ठेवायचा किंवा नाही याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पचनसंस्थेतील अनेक ठेवीदार, गुंतवणूकदार पैसे परत मिळण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.