पुण्यातील मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बिली अँड मॉलीने जिंकली रसिक प्रेक्षकांची मने
पुणे, 20 जून 2024
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने पहिल्यांदाच मुंबईबाहेर चित्रपटांचे प्रदर्शन करून एक ऐतिहासिक टप्पा सर केला. या धोरणात्मक पावलांचा उद्देश जागतिक दर्जाचे माहितीपट, लघुकथा आणि ॲनिमेशन चित्रपट यापुढे व्यापकस्तरावरील प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देणे असा आश्वासक आहे. पुण्याने भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एन एफ डी सी -एन एफ ए आय ) येथे प्रथमच मिफ रेड कार्पेटचा अनुभव घेतला, ज्यामध्ये चित्रपटक्षेत्रातील तज्ञ आणि मान्यवर सहभागी झाले होते. प्रख्यात चित्रपटनिर्माते जब्बार पटेल आणि प्राण किशोर कौल यांनी रेड कार्पेटची शोभा वाढवली आणि ही संध्याकाळ अधिकच रम्य केली. देशभरात सिनेमॅटिक उत्कृष्टता साजरी करत एक चैतन्यदायी चित्रपट संस्कृती जोमाने समृद्ध करण्याच्या मिफच्या वचनबद्धतेला या मान्यवरांच्या उपस्थितीने अधोरेखित केले.
या रम्य संध्याकाळचा विशेष केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे या महोत्सवाचा आरंभ ज्या चित्रपटाच्या प्रदर्शनाने झाला तो “बिली अँड मॉली: ॲन ऑटर लव्ह स्टोरी.” हा ओपनिंग चित्रपट. बिली अँड मॉली हा चित्रपट माणूस आणि निसर्ग यांच्यातील अतूट आणि तितक्याच गुंतागुंतीच्या नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. हा चित्रपट प्रेम देणे आणि प्रेम मिळवणे म्हणजे काय यावरील चिंतन आणि प्रेमाच्या शोधात व्यक्ती किती दूर जाऊ शकते किंवा गेले पाहिजे या मर्यादेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर जब्बार पटेल यांनी आपल्याला या महोत्सवाचे आमंत्रण दिल्याबद्दल एन एफ डी सी चे आभार मानले. बिली अँड मॉली हा एक अत्यंत उत्कृष्ट माहितीपट असून यात एक अपत्यहीन माणूस आणि एक रानमांजर यांच्यातील भावबंध अचूक टिपले आहेत. तसेच नॅशनल जिओग्राफिकच्या सिनेमॅटोग्राफीने हे सिनेमॅटिक अनुभव आणखी उदात्त झाले, असे जब्बार पटेल म्हणाले. मिफ मधील चित्रपटांचे प्रदर्शन मुंबईबाहेर करण्याचा निर्णय अत्यंत योग्य मार्गाने जाणारा आहे. असे अर्काईव्हची आठवण करून देत ते म्हणाले. हे ठिकाण म्हणजे माझे घरच असून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने येथे भारतीय चित्रपटांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींचे जतन केल्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो तसेच एका टप्प्यावर पूर्णपणे हरवलेल्या अशा दुर्मिळ चित्रपटांचे जतन केंद्रसरकार आणि एन एफ डी सी ने करून एक उदात्त कार्य केले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पुणे येथे चित्रपट प्रदर्शन करण्याचा मिफचा निर्णय म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांचे विकेंद्रीकरण करण्याच्या दिशेने आणि उच्च दर्जाचे चित्रपट अधिक मोठ्या प्रेक्षकवर्गापुढे सादर करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या उपक्रमामुळे माहितीपट, शॉर्ट फिक्शन आणि ॲनिमेशन चित्रपटांना एक कलाप्रकार म्हणून सर्वदूर प्रशंसा मिळेल आणि नवोदित चित्रपटनिर्माते आणि सिनेप्रेमींना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.
“18 व्या मिफ मध्ये, एन एफ डी सी – एन एफ ए आय ने नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अंतर्गत 4K मध्ये डिजिटल रिस्टोअर केलेल्या पाच चित्रपटांचे पॅकेज सादर केले आहे” अशी माहिती एन एफ डी सी – एन एफ ए आयच्या प्रवक्त्यानी दिली. सत्यजितचा रे यांचा पिकू (1980), एफटीआयआयमध्ये बनलेला क्वचितच दिसणारा चित्रपट ऋत्विक घटकचा फिअर (1965), , अभुजमाडच्या आदिवासींच्या जीवनावरचा दीपक हळदणकर यांचा चित्रपट व्हेअर टाइम स्टँड स्टिल (1978) आणि बी.आर. शेंडगे यांचे द आर्ट ऑफ ॲनिमेशन (1982) हे पाच चित्रपट सादर करण्यात आले. याशिवाय, संतोष सिवन यांचा पहिला लघुपट : द स्टोरी ऑफ टिब्लू (1988) ची डिजिटल पद्धतीने जतन केलेली आवृत्ती देखील 18 व्या मिफ मध्ये सादर करण्यात आली” हे सर्व चित्रपट एन एफ डी सी – एन एफ ए आय चित्रपटगृहात शनिवार 22 जून रोजी दाखवले जातील.
एन एफ डी सी – एन एफ ए आय विषयी :
भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) – भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) ही भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकास, जतन आणि संवर्धनासाठी समर्पित भारतातील प्रमुख संस्था आहेत. सिनेमॅटिक कामांचा व्यापक संग्रह आणि सर्जनशील प्रतिभेला चालना देण्याच्या वचनबद्धतेसह, एन एफ डी सी – एन एफ ए आय, भारतीय चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियाना’ बद्दल:
राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक सरकारी उपक्रम आहे. भारताच्या अफाट सिनेसृष्टीतील वारशाचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. बहुमोल चित्रपटांचे पुनरुज्जीवन आणि संरक्षण करून, हे अभियान भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्धतेबद्दलअधिक सजगता निर्माण करून तसेच अभिमानाची भावना वाढववून, भावी पिढ्यांना हा वारसा उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे.