सातारा : शेरेवाडी ता.सातारा येथील गावटग्यांच्या अन्यायाला कंटाळून गावातीलच सचिन स्वामी यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. यामध्ये त्यांनी शेरेवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि माने कुटुंबियांकडून अन्याय होत असल्याचे म्हटले आहे.
सचिन स्वामी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, त्यांच्या मिळकत नंबर १६३ मधील गुरांच्या गोठ्याची डागडुजी चालू असताना तंटामुक्ती अध्यक्ष अनंत गवाणे, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि माने कुटुंबीयांनी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत दमदाटी करून शेडचे दुरुस्ती काम बंद पाडत शेडच्या ६ पोलचे नुकसान केले. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊनही या गावटग्यांच्या राजकीय दबावामुळे मला पोलिसांकडूनही योग्य तो न्याय मिळाला नाही. यापूर्वी देखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्वच्छतेच्या नावाखाली माझ्या जागेतील चिंचेच्या झाडाचे नुकसान केले होते. त्यावेळीही बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही माझी दखल घेतली गेली नव्हती.
गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी राजकीय हेतूने माने कुटुंबियांना हाताशी धरत माझ्यावर अन्याय करून माझी जागा बळकविण्याचा कट रचला आहे. मला कोणताही कौटुंबिक आधार नसल्याने माझ्या असहाय्यतेचा फायदा संबंधित घेत आहेत. तंटामुक्ती अध्यक्ष गवाणे यांच्यासह माने परिवार हे माझ्या घातपाताचा कट रचत आहेत. तरी मला न्याय मिळावा, अन्यथा मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा यावेळी सचिन स्वामी यांनी दिला.