आजपासून आचारसंहिता लागू
लोणंद : बहुप्रतीक्षित लोणंद नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. लोणंद नगरपंचायतसाठी पुढील महिन्यात २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून आजपासून आचारसंहिता लागू करण्यास आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची तारीख मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर असणार आहे. नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाइटवर भरण्यासाठी दि. १ डिसेंबर ते ७ सात डिसेंबर असा असेल. तर नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचा कालावधी दि.१ डिसेंबर सकाळी अकरा ते ७ डिसेंबर दुपारी तीन पर्यंत असणार आहे. दि. ४ रोजी आणि 5 रोजी शनिवार रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. आलेल्या अर्जांची छाननी दि. ८ डिसेंबर रोजी करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दि. १३ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी असणार आहे. लोणंद नगरपंचायत साठी दि. २१ रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून दूसऱ्या दिवशी दि. २२ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस करण्यात येईल.
लोणंद नगरपंचायतीची मुदत दि. ३ मे रोजीच समाप्त झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती लांबणीवर पडली होती. मात्र आज राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर निवडणूक कार्यक्रम सुरू होण्यास अवघे काहीच दिवस राहिले असले तरी अनेक इच्छुकांकडून यापूर्वीच मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात झाली आहे. तर काही गाफील असलेल्या इच्छुकांना मात्र आता चांगलीच धावपळ करावी लागणार आहे.