कोळकी : फलटण तालुक्यातील वाखरी व सासकल ३३/२२ केव्हीए वीज उप केंद्राची क्षमता वाढ आणि हिंगणगाव येथे नवीन ३३/२२ केव्हीए वीज उपकेंद्र उभारणी साठी ३ कोटी ६५ लाख रुपये शेती पंपाच्या वीज बिल वसूली पैकी जिल्ह्याच्या ३३ टक्के रक्कमेतून महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सुचनेनूसार उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती आ. दीपकराव चव्हाण यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासन व वीज वितरण कंपनीने शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत, योग्य दाबाने व अखंडीत सुरु राहण्यासाठी कृषी पंप वीज जोडणी धोरण २०२० नुसार कृषी विशेष निधी योजनेतून शेती पंपाच्या वसूल वीज बिलांपैकी ३३ टक्के रक्कम संबंधित गावात खर्च होईल, जिल्हास्तरावर वसूल होणाऱ्या एकूण रक्कमेतून ३३ टक्के रक्कम जिल्ह्यात खर्च होईल आणि उर्वरित ३४ टक्के रक्कम वीज वितरण कंपनीकडे जमा होईल, असे ठरविण्यात आले आहे.
फलटण तालुक्यात अलीकडे ३५ कोटी ५४ लाख ४ हजार रुपये शेती पंप वीज बील वसूल झाला. त्यापैकी ११ कोटी ७२ लाख ९ हजार रुपये संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात नवीन वीज ट्रान्सफर्मर, वीज वाहिन्या, वीज यंत्रणा दुरुस्ती वगैरे कामांसाठी उपलब्ध झाले असून त्यापैकी ५ कोटी ३६ लाख रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या ११ कोटी ७२ लाख ९ हजार रुपयांपैकी ३ कोटी ६५ लाख रुपये फलटण तालुक्यात ३ वीज उप केंद्रासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. उर्वरित २ वीज उपकेंद्र क्षमता वाढीसाठी निधीची तरतूद या योजनेतून करण्यात येत असल्याचे आ. दीपकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
वाखरी येथील ३३/२२ केव्हीए वीज उप केंद्रातील सध्याच्या ५ एमव्हीए वीज ट्रान्सफर्मर क्षमता १० एमव्हीए वाढीसाठी १ कोटी १८ लाख, सासकल वीज उपकेंद्राची सध्याच्या १० एमव्हीए ट्रान्सफर्मर सोबत आणखी एक ५ एमव्हीए ट्रान्सफर्मर बसवून क्षमता वाढीसाठी ८१ लाख रुपये आणि हिंगणगाव येथे १० एमव्हीए क्षमतेचे नवीन ३३/२२ केव्हीए वीज उपकेंद्र उभारणीसाठी १ कोटी ६६ लाख, असे एकूण ३ कोटी ६५ लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आल्याचे आ. दीपकराव चव्हाण यांनी सांगितले आहे.
सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांनी जिल्हास्तरावरुन हा निधी उपलब्ध व्हावा यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करुन आपल्या मतदार संघासह शेजारच्या मतदार संघासाठी या योजनेतून भरीव निधी उपलब्ध करुन घेतला आहे.
वीज वितरण कंपनी प्रकाश गड, मुंबई येथील मुख्य अभियंता वितरण यांनी या तीनही ३३/२२ केव्हीए ट्रान्सफर्मर क्षमता वाढ व नवीन ३३/२२ केव्हीए वीज उप केंद्र उभारणीस तांत्रिक व प्रशासकीय मान्यता दिली असल्याने सदर कामांच्या निविदा काढून कामे करण्यात कोणतीही अडचण नसल्याचे मुख्य अभियंता बारामती झोन सुनील पावडे यांनी सांगितले आहे.
फलटण तालुक्यात झालेला पाऊस आणि भाटघर व वीर या पूर्वीच्या २ धरणांसह नीरा – देवघर व धोम – बलकवडी या २ नवीन धरणातून होणारा पुरेसा पाणी पुरवठा तसेच विविध ओढे नाल्यावर उभारण्यात आलेले बंधारे, पाझर तलाव यामध्ये असलेल्या पाणी साठ्यामुळे तालुक्याच्या जिरायती पट्टयातील विहिरीमध्ये सध्या समाधानकारक पाणी साठा आहे. परिणामी नवीन शेतीपंप वीज जोडणी, वाढत्या वीज मागणीला योग्य दाबाने अखंडित वीज पुरवठा आवश्यक झाला असून त्यादृष्टीने कृषी विशेष निधी योजना (ds) उपयुक्त ठरत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांनी निदर्शनास आणून दिले आहे.