सातारा : आज शेतकऱ्यांची नवी पिढी शेतीपुरक व्यवसाय करीत आहे. मधुमक्षीपालन हे उत्पन्नाचे प्रभावी साधन असून याकडे शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने आर्थिक उन्नतीचा मार्ग म्हणून पहावे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मध संचानालय, महाबळेश्वर येथील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व विविध उपक्रमांचा शुभारंभ उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाला यावेळी श्री. देसाई बोलत होते. या कार्यक्रमास उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जे. मो. अभ्यंकर, प्रधान सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ डॉ. नीलिमा केरकेट्टा, मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकरी मधुमक्षीपालन करीत आहेत. त्याचे फायदे आज दिसत आहेत. आज मोठमोठया पंचातारांकित हॉटेलमध्ये जाम आणि जेलीच्या ठिकाणी मधाची बॉटल देत आहेत. आज नागरिकांमध्ये मधाची खूप मागणी आहे. मध संचालनालयाने शेतकऱ्यांना मधुमक्षीपालनाबाबत प्रशिक्षित करावे जेणे करून ते या व्यवसायाकडे वळतील. महाबळेश्वरच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून महाबळेश्वरचा विकास करण्यात येईल व पर्यटनाला अधिकची चालना मिळेल. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अनेक चांगल्या योजना आहेत. या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोचवा तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाला अधिकचा निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
यावेळी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, स्थानिक उपलब्धतता आहे त्यातूनच उद्योग उभे करण्यावर शासनाचा भर आहे. मधाला अनन्य महत्त्व असून या मधाच्या सेवनामुळे आपल्या आरोग्य चांगले राहते. या मधाचा लहान मुलांनी, गरोदर मातांनी रोज एक चमचा सेवन केले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व अंगणवाड्यांमध्ये शासनामार्फत पोषण आहार दिला जातो, या पोषण आहाराबरोबर विद्यार्थ्यांना एक चमचा मध सेवनासाठी मिळेल यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगून पर्यटन विभागाकडून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाला निधी देण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
मध संचालनालयाकडून तयार करण्यात येणाऱ्या मधाची मोठया प्रमाणात जाहिरात करावी. तसेच मध संचालनालयास भेट देण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी मधाची निमिर्ती कशी होते याची चित्रफित दाखवावी, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी सांगितले.
महाबळेश्वर व परिसरातून 1 लाख किलो मध संकलित केला जाते. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत भर पडत आहे. आज बाजारपेठेत सेंद्रिय मालाला खुप मागणी आहे. सेंद्रिय निर्मितीवर भर द्यावा. आज मध संचालनालयाची सुसज्ज अशी इमारत उभी राहिली आहे. या इमारतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उर्जित अवस्था मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. शासनाने महाबळेश्वरच्या विकासासाठी 100 कोटी निधी दिल्याबद्दल आमदार मकरंद पाटील यांनी शासनाचे शेवटी आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव डॉ. नीलिमा केरकेट्टा यांनी केले तर आभार दिग्विजय पाटील यांनी मानले. या कार्यक्रमात माजी आमदार सदाशिव सपकाळ, नितिन बानगुडे-पाटील, बाळासाहेब भिलारे, डी.एम. बावळेकर यांच्यासह विविध संस्थंचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.