लोणंद : लोणंद नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची आढावा बैठक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत लोणंद येथील राधेशाम मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी लोणंद नगरपंचायत काँग्रेस सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले. पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज ही पहिलीच निवडणूक ॲड. बाळासाहेब बागवानांशिवाय असून ही निवडणूक स्वबळावर लढायची आहे. लोणंदचा विकास करायचा असेल तर पक्षाच्या हाती एकहाती सत्ता आली पाहीजे. त्यासाठी सर्व १७ प्रभागातून सुशिक्षित व युवा उमेदवार शोधा. तसेच इतर पक्षांतील कोणी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असतील तर लढण्यास इच्छुक असणाऱ्या इतर पक्षांतील उमेदवारांनाही पक्षात सामावून घेतले जाईल.
या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना खंडाळा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सर्फराज बागवान यांनी बाळासाहेब बागवान यांचे स्वप्न असलेली चोवीस बाय सात पाणी योजना, भूमिगत पथदिवे, आदी विकासकामे पूर्ण होण्यासाठी काँग्रेसला बहुमत मिळवावे लागेल. आम्ही सर्व सतराच्या सतरा जागांवर सक्षम उमेदवार ऊभे करण्याची तयारी केली असून तुम्ही फक्त आदेश द्या. २२ डिसेंबरला गुलाल आपलाच असेल, असे सांगत आपण स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना दादासाहेब शेळके यांनी सर्व सतरा जागा जिंकून बाळासाहेब बागवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा मानस लोणंद काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे सांगितले. तसेच निसार आतार व मस्कू शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी सर्फराज बागवान, राजेंद्र डोईफोडे, शैलजा खरात, राजेश शिंदे, ॲड. बबलू मणेर, रमेश कर्णवर, दत्ता खरात, इम्रान बागवान, शरद भंडलकर, निसार आतार, हेमंत खरात ईक्बालभाई बागवान, विशाल जाधव तसेच मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी तारीक बागवान यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.