महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : (बारामती)
मागील पाच ते सहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अथक परिश्रम घेत असलेल्या डॉक्टरांवर हल्ला होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. असाच एक प्रकार बारामती शहरात घडला. काल रात्री शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरांना अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी बारामती शहरातील भूलतज्ञ डॉ.सुजित दामोदर अडसुळ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर घटनेची हकीकत अशी की, काल रात्री १०.३० सुमारास शहरातील डॉक्टर राहुल जाधव यांच्या आरोग्य हॉस्पिटल मध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर शिवाजी जाधव( पूर्ण नाव व पत्ता माहीती नाही) याने अनाधिकृत हॉस्पिटल मध्ये प्रवेश करून संबंधित मृत रुग्णाच्या मृत्यूचा जाब विचारत येथील डॉक्टर व परिचारकांबाबत अश्लील हावभाव करून शिवीगाळ केली. तसेच तुमच्याकडे बघून घेतो, जिवंत सोडणार नाही. अशी दमदाटी करून मारहाण व धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपीवर बारामती शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार आगवणे करीत आहेत.