महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (बारामती): विनोद गोलांडे
वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिस ठाण्याच्या हद्दीत ट्रकवर दरोडा टाकत सुमारे चार कोटी ६१ लाख रुपयांच्या सिगारेट लंपास केल्याच्या गुन्ह्यातील सात जणांविरोधात पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. मोक्कांतर्गत कारवाई झालेले सर्व आरोपी मध्य प्रदेशातील रहिवाशी आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
कल्याणसिंग सदुलसिंग चौहान (वय ४४, रा. ओढ, ता. सोनकच, जि. देवास), ओमप्रकाश कृष्णा झाला (वय ३८, रा. भैरवखेडी, ता. टोकखुर्द, जि. देवास), दिनेश वासुदेव झाला (वय ५०), सुशील राजेंद्र झाला (वय ३७, दोघे रा. टोककला, ता. टोकखुर्द, जि. देवास), मनोज उर्फ गंगाराम राजाराम सिसोदिया (वय ४२, रा. भैरवखेडी, ता. टोकखुर्द, जि. देवास), सतीश अंतरसिंह झांझा (वय ४०) व मनोज केससिंह गुडेन (वय ४० दोघे रा. ओढ, ता. सोनकच, जि. देवास) अशी मोक्कांतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
या आरोपींनी २४ जून २०२० रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोरगाव ते नीरा रस्त्यावर आयशर ट्रक (एनएल-०१, एल- ४३३९) वर दरोडा टाकला होता. हा ट्रक रांजनगावच्या आयटीसी कंपनीमध्ये तयार झालेली फिल्टर सिगारेट घेवून हुबळीकडे निघाला होता. या दरोड्यात ४ कोटी ६१ लाख ८८ हजार रुपयांचा माल लंपास करण्यात आला होता. १३ अनोळखी इसमांनी ट्रकवर दरोडा टाकत तो लुटला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सपोनि गुंड, पोसई मोरे यांच्या मदतीने वडगाव निंबाळकर पोलिसांनी करत सातजणांना अटक केली. तर त्यांच्याकडून ३ कोटी ८९ लाख ३४ हजार रुपयांच्या सिगारेटी व दोन ट्रक जप्त केले होते.
या आरोपींविरुद्ध महाराष्ट्रात यवत, शिक्रापूर, शनि शिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच परराज्यात कर्नाटकात ब्यादगी, हुबळी पोलिस ठाण्यात, उत्तरप्रदेशात खोराबार पोलिस ठाणे हद्दीत, पश्चिम बंगालमध्ये सागरदीघी, आरोपीसा, हरियाणा राज्यातही त्यांच्यावर औषधी ट्रक लुटणे, सिगारेटच्या ट्रकवर दरोडा टाकणे असे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस निरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे सादर करण्यात आला होता. तो मंजूर झाला. या गुन्ह्याचा तपास नारायण शिरगावकर करत आहेत.
ही कारवाई तत्कालीन पोलिस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, वडगावचे सपोनि सोमनाथ लांडे, उपनिरीक्षक गणेश कवितके, कर्मचारी विठ्ठल कदम, भाऊसाहेब मारकड, अमोल भुजबळ आदींनी केली आहे.
अप्पर अधिक्षकांकडून १५ हजारांचे बक्षीस
या पथकाला अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी या कामगिरीबद्दल १५ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
बारामती मोक्कामध्ये टॉपला
बारामती उपविभागात मागील दोन वर्षात सर्वाधिक मोक्का कारवाया करण्यात आल्या आहेत. या कालावधीत १६ टोळ्यांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. यातील १२२ आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यातील १०९ आरोपी अटक करण्यात आलेले आहेत.