जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठारावर रानफुलांचा रंगोस्तव सुरू झाला आहे. त्यामुळे हे सप्तरंगी कास पठार बुधवारपासून खुले करण्याचा निर्णय कास पठार कार्यकारी समिती व वनविभाग जावळी-सातारा यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. येथे प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक असून, 100 रूपये तिकीट असणार आहे. या बैठकीला सहायक वनसंरक्षक सुधीर सोनावले, जावळी वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी, वनक्षेत्रपाल निवृती चव्हाण, वनरक्षक नीलेश रजपूत, वनरक्षक स्नेहल शिंगारे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते. कास पठारावर रानफुलांचा रंगोस्तव सध्या सुरू झाला आहे. फुलांच्या कळ्या उमलल्या असून, पठार विविध फुलांनी बहरणार आहे. महाबळेश्वर-पाचगणी खुले झाल्याने कास कधी खुले होणार याकडे पर्यटकांचे लक्ष लागले होते. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत 25 ऑगस्टपासून पर्यटकांसाठी कास पठार खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऑगस्ट ते ऑक्टोबर फुलांचा बहर
पावसाळा सुरू झाला की कासवर विविध फुलांच्या प्रजाती अंकुरू लागतात. हळूहळू सप्तरंगी फुलांचा बहर वाढत जातो. ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात रानफुलांचा बहर मोठ्या प्रमाणात असतो. हिरव्यागार गालिच्यावर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली, वाऱ्यावर डोलणारी विविधरंगी फुले मन मोहून टाकतात.
दररोज तीन हजार पर्यटकांना प्रवेश
कास पर्यटन हंगामासाठी 120 कर्मचारी घेण्यात येणार असून, प्रत्येक गावातून तीन महिला कर्मचारी असणार आहेत. ऑनलाइन बुकिंग असेल तरच प्रवेश देण्यात येणार आहे. ऑफ लाइन येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. दररोज तीन हजार पर्यटकांनाच पठारावर प्रवेश दिला जाणार आहे.
कास पठार समिती अध्यक्षपदी मारूती चिकणे
कास संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कास गावचे दत्तात्रय सीताराम किर्दत यांची निवड करण्यात आली. आज झालेल्या बैठकीत चिठ्ठी टाकून या निवडी करण्यात आल्या.