माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा
पाटण : रक्तदान हेच जीवनदान आहे. रक्तदानाविषयी जागरुकता वाढवणे जरुरीचे आहे. तसेच गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. आपण सर्वांनीच रक्तदान करायला हवे, मग ते कुणाहीसाठी असो, असे प्रतिपादन दीपकसिंह पाटणकर यांनी केले.
माजी सार्वजिनक बांधकाम व पर्यटनमंत्री विक्रमसिंह पाटणकर(दादा) यांच्या वाढदिवसानिमित कोयना शिक्षण संस्थेचे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण मध्ये एन.एस.एस. विभाग व रोटरी क्लब पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डोंगरी विकास समितीचे सदस्य शंकरराव शेडगे, प्राचार्य डॉ. एस.डी.पवार, कार्यक्रम अधिकारी डॉ. जी.एस. पट्टेबहादूर, रोटरी क्लब पाटण चे अध्यक्ष रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीपकसिंह पाटणकर म्हणाले की, सर्वांनी रक्तदान करायला हवे. रक्तदान करण्याचे अनेक फायदे आहेत. रक्तदान करणाऱ्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो, रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी मर्यादित राहते, हृदयविकारापासून संरक्षण मिळते, लठ्ठपणावर नियंत्रण राहते. म्हणजेच रक्तदान ही फक्त मानव सेवाच नाही तर स्वतःच्या आरोग्याची घेतलेली काळजीही आहे, असे त्यांनी सांगितले. स्वत:चा किंवा लग्नाचा वाढदिवस यासारखे दिवस खऱ्या अर्थाने संस्मरणीय बनवण्यासाठी रक्तदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
डोंगरी विकास समितीचे सदस्य शंकरराव शेडगे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा वाढदिवस नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करून साजरा केला जातो. रक्तदान करणे ही एक प्रकारची देशसेवाच आहे. तसेच शेडगे यांनी स्वता सुद्धा रक्तदान करून इतर रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. प्राचार्य डॉ. एस.डी. पवार म्हणाले की, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित दरवर्षी महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम केले जातात त्यामध्ये रक्तदान शिबीर, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि याला आज सुद्धा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. शेवटी त्यांनी विक्रमसिंह पाटणकर यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. जवळपास ८० युवक व युवतींनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व हेल्मेट भेट देण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत डॉ. जी.एस. पट्टेबाहादूर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. एल.एस. भिंगारदेवे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. बळीराम लोहार यांनी केले. या रक्तदान शिबिरासाठी प्रा. डी.डी. थोरात, कार्यालयीन अधीक्षक विजय काटे, प्रा.डी.के.रेवडे, प्रा. अमोल मोहिते, प्रा. हकीम, प्रा.सौ.डॉ. एच.व्ही.काटे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.