खा. श्रीनिवास पाटील : लायन्स क्लब ऑफ कराडच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा संपन्न
कराड : मनापासून केलेले काम हे आयुष्यभर टिकते. पत्रकारांनीही अगदी तळमळीने केलेल्या कामाची समाजाकडून त्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नक्कीच पोच मिळते. समाजाने पाठीवर दिलेली हीच कौतुकाची थाप अत्यंत महत्त्वाची असते, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
कराड अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये मंगळवारी 11 रोजी पत्रकार दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ कराडच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, लायन्स क्लबचे द्वितीय उपप्रांतपाल भोजराज निंबाळकर, सातारचे जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, लायन्स क्लब ऑफ कराडचे सचिव संजय पवार, अध्यक्ष खंडू इंगळे, खजिनदार मिलिंद भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते कराड तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
खा. पाटील म्हणाले, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्या राहणीमानात विलक्षण बदल झाला. त्यामुळे जीवनाचा आणि जगण्याचा खरा मतितार्थही लोकांना समजला आहे. त्यामुळे पत्रकारांनी चाकोरीबाहेर जाऊन स्वतःसह कुटुंबीयांनाही वेळ देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पर्यटन हे सर्वोत्तम माध्यम असून पत्रकारांनी पर्यटनाचीही लेखणी हाती घ्यावी, असे आवाहनही खा. पाटील यांनी यावेळी केले.






















