
विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाले असून निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी सोसायटीच्या सभासदांनी तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे केली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बावधन सोसायटीच्या २०२१-२२ ते २०२६-२७ या कार्यकाळासाठी श्री भैरवनाथ विकास आघाडीतून आम्ही निवडणूक लढवित होतो. या निवडणुकीचे मतदान रविवारी दि. १३ फेब्रुवारी रोजी होऊन सायंकाळी : निकाल जाहीर करण्यात आले. वाईचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) यांच्यावतीने निवडणूक प्रक्रिया झाली. या निवडणुकीत वापरलेल्या मतपत्रिकांवर कुठेही अनुक्रमांक नव्हता. प्राथमिक शाळेच्या चार खोल्यांमध्ये प्रत्येकी १ ते ४००, ४०१ ते ८००, ८०१ ते ११५०, ११५१ ते १५०३ इतक्या मतदारांना मतदान करता येत होते. परंतु, या खोल्यामध्ये किती नंबरचे बॅलेट पेपर होते, याची संख्या अथवा शिल्लक मतपत्रिका याची माहिती उपलब्ध झाली नाही. मतपेट्यांना कापडी आवरण घालून सील केले नव्हते. फक्त पत्रापेटीला वरून कुलूप लावले होते. मतपेट्या किती वेळ कोणाच्या ताब्यात होत्या, त्यानंतर किती वेळाने मतमोजणी सुरूवात केली, याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना देता आली नाही. मतमोजणीच्या वेळेला उमेदवार देत असलेला हरकत अर्ज वरिष्ठांच्या दबावामुळे घेतला नाही. कोणत्याही प्रकारची पोहच देण्यास ते अधिकारी तयार नव्हते. हे सर्व संशयास्पद आहे.
इतर प्रवर्गाची मतमोजणी होण्याअगोदरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करण्याअगोदरच बाहेर निकाल कसा समजला, हा सर्व प्रकार निंदनीय आहे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया संशयास्पद आहे, असे सभासदांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत आठ दिवसांत योग्य ती चौकशी करावी, आमचेवर होणारा अन्याय दूर करावा अन्यथा उमेदवार व त्यांचे कुटुंबीय, सभासद तहसील कार्यालय येथे उपोषण करणार आहोत, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर भैरवनाथ विकास आघाडीचे उमेदवार प्रकाश कदम, दिलीप दाभाडे, धनंजय पिसाळ, बाळकृष्ण पिसाळ, रमेश पिसाळ, अविनाश भोसले, किसन भोसले, तेजस मांढरे, शोभा पिसाळ, मंगल भोसले, किसन कचरे, सखाराम कचरे यांच्या सह्या आहेत. पत्रकार परिषदेस ग्रामपंचायत सदस्य विवेक भोसले, संदीप पिसाळ, विजय रासकर, विक्रम पिसाळ, सुनील व्यंकट कदम, सचिन भोसले, विजय दाभाडे, प्रकाश यदू पिसाळ, सुभाष भोसले, चंद्रकांत भोसले (वहिवाटदार), विक्रम वाघ, धुळा ठोंबरे, नंदू कचरे, हिरामण पिसाळ, राजेंद्र पिसाळ व ग्रामस्थ उपस्थित होते. आणखी काही गावांतही असाच प्रकार सोसायटीच्या निवडणुकीत मतपत्रिकांवर अनुक्रमांक टाकले नसल्याचा प्रकार वाई तालुक्यातील बावधनबरोबरच मेणवली- भोगाव पांडेवाडी, लोहारे व अन्य गावांच्या सोसायटीमध्येही घडला आहे. त्यामुळे या सर्व गावातील काही सभासदांनी फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
Attachments area






















