महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. २५ मार्च : पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्था संचलित हनुमान विद्यालय, निढळ (ता. खटाव) येथील शिपाई कर्मचारी दिलीप कारंडे हे आपल्या प्रदीर्घ ४० वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त रविवार दि. २७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता हनुमान विद्यालयामध्ये त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी दैनिक महाराष्ट्र न्यू शी बोलताना दिली. कारंडे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये आपली ४० वर्षाची सेवा अतिशय प्रामाणिकपणे आणि नम्रपणे पूर्ण केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शांच्या मार्गावरून मार्गक्रमण करत विविध शाखातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांची मनापासून सेवा करण्याची संधी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मिळाल्याची भावनिक प्रतिक्रिया कारंडे यांनी दैनिक महाराष्ट्र न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. मी माझ्या ४० वर्षांच्या सेवेमध्ये पूर्ण समाधानी असून समाधानी वृत्तीने सेवानिवृत्त होत असून भविष्यात ज्या समाजामधून मी पुढे आलो, त्या समाजाच्या सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी मी माझे उर्वरित आयुष्य खर्ची घालणार असल्याची प्रतिक्रिया कारंडे यांनी व्यक्त केली.
कारंडे यांच्या सेवानिवृत्ती समारंभाला रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी सुरेश गोडसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य के.के घाटगे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, तर धर्मवीर संभाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, देगाव (पाटेश्वर) चे प्राचार्य आणि आजीव सेवक सतीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.