पाटण : म्हारवंड येथे 36 वर्षीय विवाहित महिला आणि 40 वर्षीय विवाहित पुरुषाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळजनक माजली आहे. शोभा गुलाब पवार (वय 36) आणि प्रकाश भिकू निकम (वय 40) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.दरम्यान ही घटना प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा परिसरातून व्यक्त होत असून या घटनेची फिर्याद मृत महिलेची आई आणि मृत पुरुषाचा भाऊ यांनी पाटण पोलिसांत दिली असून या घटनेच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत मृत शोभा पवार हिची आई कालाबाई यशवंत चव्हाण (वय 60 रा बामणेवाडी ता पाटण) यांनी पाटण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार,शोभा गुलाब पवार (वय 36) हीचा विवाह गुलाब पवार (रा.म्हारखंड ता. पाटण) यांचेशी झाला होता. तिचे पती मयत झालेनंतर मुलगी शोभा ही मुंबई येथे कामास होती व नातु रोशन हा सातारा येथे शिक्षणास आहे. मुलगी शोभा ही मुंबईहुन रविवार दि 20 मार्च रोजी बामणेवाडी येथे आमचेकडे आली होती. त्यानंतर ती मंगळवार दि.22 रोजी पाटण येथे कामानिमित्त जाते असे सांगुन म्हारवंड येथे आली होती. दिनांक 22 रोजी शोभा दिवसभर घरी बामणेवाडी येथे आली नसलेमुळे आम्ही दिनांक 23 रोजी रात्री 11 वाजता शोभाला शोधण्यासाठी तिच्या सासरी म्हारवंड येथे गेलो असता शोभा ही प्रकाश निकम यांच्या घरी गेली आहे. शोभा व प्रकाश हे लग्न करणार होते असे सांगुन गेले आहेत असे सांगितले.त्यानंतर प्रकाश निकम यांचे घरी जाऊन येथे शोभा आली आहे का असे विचारले असता प्रकाश निकम याचे पत्नीने सांगितले की ते दोघे फोन लावण्यासाठीच धावडमळी कडे गेले आहेत. मात्र आम्ही सर्वजण रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास धावडमळीकडे गेलो असता एका शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या करून मृत अवस्थेत निदर्शनास आले. दरम्यान या घटनेतील मयत प्रकाश निकम यांचा भाऊ सावळा भिकू निकम वय 44 यांनी ही पाटण पोलिसांत तक्रार दिली असून या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेची नोंद पाटण पोलिसांत झाली असून अधिक तपास पोनि एन. आर. चौखंडे करत आहेत.