दहिवडी : ता.०५
सध्या श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीसाठी अनेक इच्छुकांनी अर्ज भरले असून याविषयीची छाननी प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या प्रक्रियेदरम्यान सिद्धनाथ पतसंस्थेचे माजी चेअरमन सुनील पोळ यांच्या अर्जावर इच्छुक उमेदवार अरुण गोरेंनी हरकत घेतली आहे.
श्री सिद्धनाथ सहकारी पतसंस्थेच्या १३ जागांसाठी होत असलेल्या संचालकपदाच्या निवडणुकीत एकूण ७२ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून ३९, महिला राखीव प्रवर्गातून ११, इतर मागास प्रवर्गातून ०७, विमुक्त जाती/भटक्या जमाती/ भटक्या मागास प्रवर्गातून १० तर अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातून ०५ असे एकूण ७२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
या सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. यामध्ये ७२पैकी एकही अर्ज अवैध ठरला नसून सुनील पोळ यांच्या अर्जावर अरुण गोरे यांनी हरकत नोंदवली आहे. त्यामुळे सुनील पोळ यांचा अर्ज वैध ठरणार की अवैध? हे सोमवारी ठरणार असल्याने सहकार क्षेत्रात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
या निवडणूकीसाठी सागर पोळ, सुनील पोळ आणि शेखर गोरे यांचे तीन पॅनेल रिंगणात आहेत. तसेच अनेक इच्छुकांनीही अर्ज दाखल केल्याने सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालक पदासाठी एकूण ७२ जणांनी आपले नशीब आजमावण्याचे ठरवले आहे. यामध्ये २२ जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत, तर २३ जानेवारीला सकाळी ११वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हे वाटप करण्यात येणार आहेत.
मतदान ३१ जानेवारी रोजी होणार आहे.