फलटण प्रतिनिधी / श्रीकृष्ण सातव
फलटण :फलटण तालुक्याच्या पंचायत समितीमधील शिक्षण विभागातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. फलटण तालुक्यातील 43 सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या सुधारित निवृत्ती वेतन प्रस्तावांची पूर्तता न केल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
फलटण तालुक्यातील 1 जानेवारी 2006 ते 26 फेब्रुवारी 2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या 43 प्राथमिक शिक्षकांच्या सुधारित पेन्शन प्रकरणी काही त्रुटी काढून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून फेब्रुवारी 21 मध्ये ती प्रकरणे फलटण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे परत पाठविण्यात आली आहेत. यासंदर्भात फलटण तालुका सेवानिवृत्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून 25 जुलै रोजी गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार, संबंधित गटशिक्षणाधिकारी, लिपिक यांच्या उपस्थितीत या प्रकरणावर चर्चा केली. त्यावेळी 2 ऑगस्ट 21 पर्यंत वरील सर्व प्रकरणी त्रुटींची पूर्तता करून जिल्हा परिषदेला ते प्रस्ताव परत पाठवण्यात येतील अशी कार्यवाही करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिले. त्याच वेळी हे काम पूर्ण करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मदत लागल्यास पदाधिकाऱ्यांनी मदत/ सहकार्य करण्याचे कबूल केले.

त्यानंतर संघटनेचे सचिव रामचंद्र कदम व सेवानिवृत्त लिपिक शिंदे यांनी सर्व पूर्तता केली. पण अद्यापही ते सुधारित पेन्शन प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर झालेले नाहीत. दरम्यानच्या काळात फलटण पंचायत समितीतील प्रभारी गटशिक्षणाधिकारी रमेश गमरे यांची नुकतीच दहिवडी येथे बदली झाली असून फलटण पंचायत समिती शिक्षण विभागाचा कार्यभार त्यांच्याकडेच सोपविण्यात आलेला असल्याचे समजते. केवळ गट शिक्षणाधिकारी यांच्या उदासीनतेमुळे आणि दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या आठ महिन्यापासून सुधारित पेन्शन प्रस्ताव सादर झालेले नाही. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन कार्यवाही करावी. त्यामुळे ४३ सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना त्यांचे सुधारित सेवा निवृत्ती वेतन त्वरित मिळेल असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.




















