महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा, दि. १६ एप्रिल : राज्याच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा आणि महाराष्ट्र उद्योजकता महामंडळाच्यावतीने दिला जाणारा ‘बेस्ट सोशल आणि इंडस्ट्रियल लिडरशीप आयकॉन ऑफ महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२२’ या पुरस्काराने पुणे येथील स्मॅश एलिव्हेटरचे डायरेक्टर तरुण उद्योजक कुंडलिक सातपुते यांना नाशिक येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र उद्योजकता महामंडळाच्यावतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार समारंभामध्ये उद्योगक्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आणि मराठी सिनेमासृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या शुभहस्ते राज्यातील सुमारे १०० तरुण उद्योजकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाल्या, उद्योग-व्यवसायात कौतुकाची थाप मिळाल्याने या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेण्यास उर्जा प्राप्त होत असते. पुरस्कार ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करीत असलेल्या व्यक्तीची मूलभूत गरज आहे. पुरस्कारामुळे कौतुकाची भूक भागविली जाते. यामुळे उत्तम कामगिरीचे कौतुक झालेच पाहिजे. राज्यातील उत्कृष्ट काम करीत असलेल्या उद्योजकांचा सन्मान झालाच पाहिजे आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजातील इतरांनी घ्यावी आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील उद्योजकांना जोडून एक मोठं कार्य उभा करण्याचा मानस या महामंडळाच्यावतीने करण्यात येत आहे. हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून या अत्यंत मानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला मला प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देते आणि उद्योग क्षेत्रातील पुरस्कारा प्रमाणेच सिनेसृष्टीतील कलाकारांनाही गौरविण्यात येईल, अशी अपेक्षा याप्रसंगी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी व्यक्त केली. दैनिक महाराष्ट्र न्यू शी बोलताना कुंडलिक सातपुते म्हणाले, एवढ्या तरुण वयात मला हा अत्यंत मानाचा महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार मिळाल्याबद्दल अत्यंत आनंद व समाधान होत आहे. स्मॅश एलिव्हेटरच्या माध्यमातून काम करीत असताना समाजातील नागरिकांनी माझ्यावर आणि माझ्या टीमवर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाबद्दल मी समाजाचा सदैव ऋणी राहीन आणि महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन भविष्यात लोकांना चांगली सेवा देण्यासाठी मी आणि कंपनी सदैव तत्पर राहील. समाजातील सर्व लोकांच्या सहकार्यातून आणि मार्गदर्शनातून स्मॅश एलिव्हेटर ही कंपनी डोमेस्टिक मार्केटमध्ये वेगाने भरारी घेत असल्याचे सातपुते यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाला कुंडलिक सातपुते यांच्या सौभाग्यवती निशा सातपुते, चिरंजीव साई सातपुते आणि स्मॅश एलिव्हेटरचे मार्गदर्शक डायरेक्टर नितीनजी गडकरी उपस्थित होते.फोटो – महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२२ सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते स्वीकारताना तरुण उद्योजक कुंडलिक सातपुते, शेजारी नितीनजी गडकरी, निशा सातपुते, साई सातपुते.