राष्ट्रवादी काँग्रेस संवाद यात्रा सोमवारी पाटणमध्ये
ना. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक
पाटण प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिसंवाद यात्रा सोमवार १८ एप्रिल रोजी पाटण विधानसभा मतदारसंघात येणार आहे. यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघाचा आढावा ना. जयंत पाटील घेणार असल्याची माहिती पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिसंवाद यात्रा राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ व जिल्ह्यांमध्ये फिरुन आढावा घेत आहे. रविवार १७ एप्रिल रोजी या यात्रेचे सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. वाई, सातारा व कोरेगाव विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर सोमवारी १८ एप्रिल रोजी या यात्रेचे पाटणला आगमन होणार आहे. सकाळी ९.३० वा. पाटण येथील श्रीमंत रणजीतसिंह पाटणकर स्मारक मंदिर, भाजी मंडई येथे पाटण विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक होणार आहे. यावेळी विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री ना. बाबासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण, सत्यजितसिंह पाटणकर, दिपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी मान्यवर नेते, वरिष्ठ पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. यावेळी पाटण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजाभाऊ शेलार यांनी केले आहे .






























