सातारा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अर्थात उमेद अभियाना अंतर्गत कार्यरत 7114 स्वयं सहायता समूहांना जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून 120.83 कोटी अर्थसाह्य उपलब्ध करून देत सातारा जिल्हा उमेद राज्यात अव्वल ठरली आहे. या चमकदार कामगिरी बद्दल सातारा जिल्हा उमेद टीमचे गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन राज्यस्तरावर सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अर्थात उमेद अभियानांतर्गत बचत गटांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांच्या उपजीविकेची साधने बळकट करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जातात. सातारा जिल्ह्याला आर्थिक वर्षात 4950 समूहांना 103 कोटी 20 लाख रुपये अर्थसाह्य देण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. बँकांची सहायता समूहांकडे पाहण्याची नकारात्मक दृष्टि यामुळे हे उद्दिष्ट साध्य होणार की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडासो व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी सौ सुषमा देसाई मॅडम यांनी उमेद टीमला समूहांना जास्तीत जास्त कर्ज वाटप कसे करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कर्ज प्रस्ताव दाखल होऊन वाटप होईल तोपर्यंत होणारी दिरंगाई टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने कर्ज प्रस्ताव बँकेकडे सादर करण्याची पद्धत अवलंबिण्यात आली. यामुळे बँक स्तरावर प्रलंबित असलेल्या कर्ज प्रस्तावांची माहिती रिझर्व बँकेपर्यंत थेट पोहोचत असल्यामुळे कर्ज वितरणाच्या कामकाजास अधिक गती प्राप्त झाली. समूहांना तात्काळ कर्जवाटप व्हावी यासाठी बँक निहाय कर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. तालुकास्तरीय बँक जोडणी समन्वय समितीच्या बैठकांमध्ये जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या या माध्यमातून प्रलंबित कर्ज प्रस्तावांचे वाटप होण्यासाठी बँकांकडे थेट पाठपुरावा झाला. यामुळे सातारा उमेद टीमने निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक उद्दिष्ट साध्य केले. कर्ज प्रस्ताव सादर करणे यामध्ये 4950 बदल्यात 7114 म्हणजेच 144 टक्के तर अर्थसहाय्य रकमेबाबत 103 कोटी उद्दिष्टाच्या बदल्यात 120 कोटी साध्य करून 117 टक्के उद्दिष्ट गाठले.
सातारा जिल्ह्याच्या या चमकदार कामगिरीची दखल राज्य स्तरावर घेण्यात आली. महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक गंगोपाध्याय, भारतीय रिझर्व बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप कुलकर्णी, राज्य बँकर्स समितीचे सहाय्यक व्यवस्थापक भरत बर्वे, अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी यांच्या हस्ते विशेष बाब म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल जिल्हा अभियान संचालक तथा कार्यकारी अधिकारी विनय गौडा सो, जिल्हा सहसंचालक तथा प्रकल्प अधिकारी सौ. सुषमा देसाई मॅडम यांनी उमेद टीमचे विशेष कौतुक केले.या चमकदार कामगिरीसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक मनोज राजे, जिल्हा व्यवस्थापक स्वाती मोरे, जिल्हा व्यवस्थापक रंजनकुमार वायदंडे, प्रभाग समन्वयक सुनिल सुळ यांनी विशेष प्रयत्न केले.