सातारा : सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शहर व उपनगराच्या सर्व प्रभागातील जागा आम आदमी पार्टी लढवणार असल्याची माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे खजिनदार सरदार सागर भोगावकर यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भोगावकर यांनी म्हटले आहे की, एकहाती आणि समझोत्याची सत्ता असतानाही सातारा पालिकेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास आजवर होऊ शकला नाही. जनतेला झुलवत ठेवून सत्तेचा सारीपाठ साताऱ्यातील नेतेमंडळींनी खेळला, मात्र त्यांची “मिलीभगत” आता जनतेच्याही लक्षात आली आहे. निवडून येण्यापूर्वी सायकल घेण्याची पात्रता नसणाऱ्या अनेक नगरसेवकांनी आपल्या कारकीर्दीत मोठ्या प्रमाणावर माया जमा केल्याचे दिसून येते. त्यामुळे खर्या अर्थाने जनतेचे असली चेहरे यावेळी आम आदमी पार्टीच्या पॅनेलद्वारे नगरपालिकेत निवडून आणण्यासाठी आम आदमी पार्टी प्रयत्न करणार आहे. आमच्या माध्यमातून आगामी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहनही भोगावकर यांनी केले आहे.
आम आदमी पार्टीची सत्ता असणाऱ्या दिल्लीमध्ये शिक्षण, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आदी नागरी सुविधा मोफत दिल्या जातात, त्याच धर्तीवर साताऱ्यामध्ये नागरी सुविधांबाबत ‘आप’चे पॅनल निवडून आल्यावर प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या विचारसरणीवर श्रद्धा असणाऱ्या आणि त्यानुसार काम करण्याची इच्छा असणाऱ्या सक्षम आणि समविचारी कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन ही निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे इच्छुकांनी संपर्क साधावा.
सातारा नगरपालिकेत क्रांती घडवण्याचे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती निवडून आणण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आम आदमी पार्टी पुढाकार घेत आहे त्यास तमान सातारकरांनी साथ द्यावी, असेही भोगांवकर यांनी म्हटले आहे.