पाटण प्रतिनिधी : मुळगाव, ता. पाटण येथील युवा कमांडो कै. अमर आनंदा मोळावडे यांचे वयाच्या 30 व्या वर्षी मुंबई येथे आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पाटणसह तालुक्यात पसरताच सर्वस्तरातून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यांचा पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मित्र परिवार होता. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबियांसह मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर बुधवारी सकाळी मुळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.अमर मोळावडे हे 2010 साली पोलीस दलात भरती झाल्यानंतर विशेष ट्रेंनिग घेवून ते पोलीस कमांडो म्हणून सेवेत रूजू झाले होते. जवळपास 12 वर्षे ते कमांडो म्हणून मुंबई येथे कार्यरत होते. जेथे जाईल तेथे त्यांनी मोठा मित्र परिवार जोडला होता. तालुक्यासह जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिकसह सर्वच क्षेत्रात त्यांनी भरीव मदत केली आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त परिस्थिती, कोरोना काळातही त्यांचे फार मोठे योगदान लाभले असून गोरगरीब लोकांच्या मदतीसाठी ते नेहमी धावून जाण्यात सर्वात पुढे होते. एक दिलदार व्यक्तीमत्व म्हणून त्यांची पाटण तालुक्यात ओळख होती. त्यांच्या शांत, संयमी स्वभाव व दांडगा जनसंपर्कामुळे त्यांच्या पाठीशी युवकांची मोठी फळी कार्यरत होती.मंगळवार दि. 10 रोजी मुंबई येथे त्यांचे आकस्मित निधन झाले. याची बातमी पाटण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर विविधस्तरातून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

बुधवारी पहाटे 4 वाजता त्यांचे पार्थिव मुळगाव या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. तर दुसरीकडे त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. त्यांच्या जाण्याने मोळावडे कुटुंबियांसह मित्र परिवारात शोककळा पसरली आहे. अमर मोळावडे यांच्या पार्थिवास मानवंदना देवून बुधवारी सकाळी 9 वाजता मुळगाव येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. शुक्रवार दि. 13 रोजी सकाळी मुळगाव येथे रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.






















