नवारस्ता प्रतिनिधी : नेरळे, ता.पाटण येथील भारतीय बौद्ध महासभेचे प्रथम बौद्धाचार्य बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त गणपत (भाऊ) महादू भंडारे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
फुले, शाहू व आंबेडकर चळवळीतील पहिले बौद्धाचार्य म्हणून त्यांचा लौकिक तालुक्यात कायम अबाधित राहणार आहे. सन – १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन १९६२ साली ते भारतीय बौद्ध महासभेचे पहिले अधिकृत बौद्धाचार्य झाले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीशी इमाने इतबारे सेवा त्यांनी अखंड आयुष्यभर केली. १९५६ साली धर्मांतर केल्यानंतर त्यांनी सरकार दरबारी व्यथा मांडुन सौहार्दपूर्ण समाज निर्माण केला होता. त्यांनी आयुष्यभर धम्म कार्य निष्ठेने केले. सुरुवातीच्या काळात पायी प्रवास केला होता.तदनंतर सायकल असा प्रवासही केल्याचे उदाहरण आहे. त्यांनी तालुक्यातील बौद्ध सेवा संघाच्या माध्यमातून एक उत्तम वास्तू उभी केली.याकरिता कालकथित तातोबा (आण्णा) देवकांत यांच्याबरोबर सफल असा प्रयत्न करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ही वास्तू दिमाखात उभी राहिलेली पहायला मिळाली आहे. त्यांच्या अमोघ वाणीने सर्वाना ते आपलेसे करायचे. या कार्यकुशल नेतृत्वाला वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच निर्वाण होणे किती मोठा योगायोग आहे.

सर्वांचे ऋषितुल्य लाडके नेतृत्व,मार्गदर्शक आताच्या पिढीचा दीपस्तंभ निखळला. त्यामुळे भंडारे, माने परिवारासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना अनेक मान्यवरांसह भारतीय बौद्ध महासभा व धम्मबांधव ग्रुपतर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.






















