महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : आयुर्वेदिक औषध विक्री दुकानात अॅलोपॅथिक औषधाची भेसळ करून ती विक्री केल्याप्रकरणी कराड येथील गंगा मेडिकल शॉपीचे चालक अरविंद चव्हाण व बिर्ला फार्मास्युटिकल्स प्रा. लि., राजस्थान या कंपनीचे मालक नवीन कुमार बिर्ला या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक अरुण सखाराम गोडसे (सध्या रा. सातारा) यांनी कराड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.अरुण गोडसे यांनी याबाबतचा अहवाल तयार केला. बिर्ला व चव्हाण यांच्यासह आणखी काही जणांचा यामध्ये सहभाग असून संबंधित सर्वजण आयुर्वेदिक औषधांमध्ये अॅलोपॅथिक औषधांची भेसळ करत आहेत. यामुळे जनतेला गंभीर ईजा होईल, असे वर्तन असल्याने त्यांच्याविरुध्द कराड पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.अहवालानंतर तक्रारदार अरुण गोडसे यांनी गंगा मेडिसिन चालकाला औषधे व सौदर्यं प्रसाधने कायद्याअंतर्गत नोटीस पाठवून संबंधित औषधांच्या खरेदी-विक्रीचा तपशील सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार अरविंद चव्हाण यांनी औषधाबाबतची इनव्हाईस, जीएसटी बिले अशी कागदपत्रे अन्न व औषध विभागाला दिली. जीएसटी बिलांवरुन भेसळयुक्त असलेल्या औषधांची कंपनी राजस्थान येथे असल्याचे गोडसे यांच्या लक्षात आले. त्यानुसार राजस्थान येथे जावून त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित कंपनी बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे गोडसे यांनी सहाय्यक औषध नियंत्रक अजमेर, राजस्थान यांना मेल केला व माहिती पाठवण्याची विनंती केली.

त्यांच्याकडून संबंधित आयुर्वेदिक उत्पादक कंपनीचे मालक नवीन कुमार बिर्ला असल्याचे स्पष्ट झाले.याबाबत अन्न व औषध विभाग आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी, औषध निरीक्षक अरुण गोडसे यांना माहिती मिळाली होती की, कराड येथील गंगा मेडिसीन या शॉपीमध्ये बनावट आयुर्वेदिक औषधे विक्री केली जात आहेत. त्यानुसार गोडसे यांनी मेडिकलमधील काही आयुर्वेदिक औषधांचे नमुने घेतले. औषधांचे नमुने ताब्यात घेऊन त्याच्या गुणवत्तेच्या पुढील तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळा औरंगाबाद येथे ते नमुने पाठवले. जप्त केलेल्या औषधांचा औरंगाबाद येथून अहवाल आल्यानंतर ते अप्रमाणित (बनावट) असल्याचे स्पष्ट झाले.




















