उंब्रज प्रतिनिधी:-
आज युगप्रवर्तक छ.शिवाजी महाराज यांची जयंती , छ.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तरुण वर्ग गेले 2 दिवस अतिशय उत्साहात महाराजांच्या जयंतीची तयारी करत होते , त्यासाठी युवकांनी आपल्या दोन चाकी – चार चाकी गाड्यांना भगवे झेंडे बांधले होते , गळ्यात आणि डोक्याला भगव्या टापरी गुंडाळल्या होत्या , वेगवेगळ्या गड-किल्यावरून युवकांनी शिवज्योत पेटवून , सळसळत्या रक्ताने ऊन वारा याची परवा न करता आपल्या लाडक्या राजाची शिवज्योत आपापल्या मंडळात आणली होती…
काही मंडळांनी महाराजांचा पराक्रम दर्शवणारे भव्य बॅनर लावले होते , काही मंडळांनी गल्लोगल्ली भगव्या पताका व भगवे झेंडे यांची आरास केली होती , काही ठिकाणी ढोल-ताशाच्या गजरात , शिवाजी महाराज व मावळे यांची वेशभूषा करून घोड्यावर बसून डोळ्यांचे पारणे फेडणारी शाही दरबार मिरवणूक काढली होती , कुठे कुठे डॉल्बी चा दणदणाट घुमत होता , नेत्रदीपक रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजी केली जात होती , तर काही ठिकाणी महाराजांचे पराक्रम व इतिहास सांगणारे शिवव्ह्याख्याते यांचे अंगावर काटा आणणारे व्याखानाचे कार्यक्रम ठेवले होते… तर काही मंडळांनी रक्तदान , नेत्र तपासणी , मोफत आरोग्य तपासणी असे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते…
फक्त तरुणच नाही तर बालचमुंचाही उत्साह अगदी ओसंडून वाहताना दिसत होता , त्यांनी सुद्धा आपल्या या जाणत्या राजाची शिवजयंती दणक्यात साजरी केली , गावोगावी शिवजयंती ही एखाद्या सणासारखी उत्साहात आणि जल्लोषात साजरी करून रयतेच्या या राजाला मानवंदना देण्यात आली…






















