महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:-
सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा (कोविड-19) वाढता प्रादुर्भाव रोखणेचे अनुषंगाने सातारा जिल्हयात गणेशोत्सव 2020 हा सण अत्यंत साध्या पध्दतीने व शासनाने वेळोवेळी दिलेले नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरा करण्याबाबत, जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार, प्राप्त असलेल्या अधिकारान्वये, दिनांक 22 ऑगस्ट ते ते दिनांक 1 सप्टेंबर 2020 याक लावधीसाठी खालीप्रमाणे आदेश जारी करीत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी पोलीस विभागाची व स्थानिक स्वराज्य संस्थेची यथोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहील. परवानगी घेतले शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता येणार नाही.
कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये कोणत्याही प्रकारची भपकेबाजी नसावी. कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, देखावे, प्रदर्शने इत्यादी आयोजीत करणेस सक्त मनाई आहे.
श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती २ फूटांच्या मर्यादेत असावी.
या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.
उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा परंतु घरोघरी जाऊन वर्गणी मागणेस मनाई असेल.
नागरिक आकर्षित होऊन गर्दी होवू नये याकरीता कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीच्या प्रदर्शनास मनाई करणेत येत आहे.
सांस्कृतिक/गर्दीचे कार्यक्रमांऐवजी सामाजिक अंतर राखून आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे उदा . रक्तदान, आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रमांना 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस मनाई करणेत येत आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहील.
श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
गणपतीमंडपामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच दिवसातून 3 वेळा मंडप परिसराचे सॅनिटायझेशन करावे. श्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात येत आहे. श्रीच्या आगमन व विसर्जन कार्यक्रमास 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकार राहील. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरष्ठ नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाची मिरवणू स्वतंत्रपणे, एकत्रिरित्या काढण्यास सक्त मनाई आहे.
जमावबंदीबाबत सीआरपीसी 1973 चे कलम 144 अंतर्गत आदेशाचे तंतोतंत पालन करावे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, व्यक्तींमध्ये भौतीक दृष्ट्या कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता यावी.
कोविड-१९ अंतर्गत केंद्र शासन/राज्य शासन यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील.
कंटेमेंन्ट झोन मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणेस सक्त मनाई आहे. कंटेमेंन्ट झोन मधील व्यक्तींना कंटेमेंन्ट झोनच्या बाहेरील गणेशोत्सवामध्ये सहभागी होता येणार नाही. तसेच सातारा जिल्ह्यातील कंटेमेंन्ट झोन मध्ये ये-जा करण्यास सक्त मनाई आहे. तसेच कंटेमेंन्ट झोन बाबत संबंधित उपविभागीय अधिकारी तथा यांचे आदेश लागू राहतील.
गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक आहे. तसेच उक्त कालावधीत गणपती मंडळांनी त्यांचे मंडळास भेटी दिलेल्या व्यक्तींची नावे, मोबाईल क्रमांक, पत्ता,आरोग्य सेतू अॅप इ बाबतची नोंद स्वतंत्र नोंदवहीत भेटी दिलेल्या ठिकाण / कार्यालय | व्यक्ती यांची नोंद स्वतंत्र नोंदवहीत ठेवणे बंधनकारक आहे, जेणेकरुन यदाकदाचित संशयित रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोईचे हाईल.
लोक प्रतिनिधी. स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी. मिरवणुक, अन्नदान, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमातून होणाऱ्या गर्दीला टाळण्याकरिता सदर बाबींना पूर्णत: मनाई करण्यात येत आहे.. या कालावधीमध्ये गणेश मंडळाबाहेर फुलांचे हार / नारळ / मिठाई / प्रसाद इत्यादी नव्याने दुकाने लावण्यास मनाई असेल.
प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन, प्रशासनकडून काही अतिरिक्त सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे मंडळांना बंधनकार आहे.
कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रेाखण्यासाठी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे सुद्धा अनुपालन करणे बंधनकारक आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुद्ध यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असेही जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी नमुद केले आहे.
0000