दहिवडी : ता.२४
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी दहिवडीमध्ये आमरण उपोषण करणाऱ्या चार धनगर तरुणांनी अखेर हे उपोषण मागे घेतले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपोषणस्थळी येत दिलेल्या बैठकीच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. गणेशोत्सव संपल्यानंतर चारही उपोषणकर्त्यांना घेऊन पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन मागण्यांबाबत चर्चा करण्याचे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. याबाबत जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जर काही विशेष करावे लागले तर मी ते ही करेन,असेही ना.देसाई यांनी म्हटले.
सोमवारपासून हे आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या धनगर समाजाच्या हालचालींना वेग आला होता. त्यानुसार आजपर्यंत झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. या एकंदरीत घडामोडीनंतर गतिमान हालचाली होऊन पालकमंत्री शंभूराज देसाई , आ. जयकुमार गोरे, आ. गोपीचंद पडळकर, पोलीस अधीक्षक समीर शेख, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख हे शनिवारी सायंकाळी उपोषणस्थळी दाखल झाले.
उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील विषय गणेशोत्सवानंतर बैठक घेऊन मार्गी लावण्यात येतील. मेंढपाळ बांधवांवर जाणीवपूर्वक हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. इतर चार राज्यातील आरक्षण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमून त्यामध्ये धनगर समाजाच्या दोन प्रतिनिधींचा सामावेश करण्यात येईल.
संबंधित समितीच्या कामाचा पाठपुरावा करून त्याविषयी माहिती देण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी लेखी आश्वासन देतो. तसेच गायरान जमिनी या मेंढपाळ बांधवांना चारण्यासाठी देऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत केंद्राशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. या दिलेल्या आश्वासनानंतर शरद गोरड, ऍड.नितीन कठरे, वैभव गोरड, सुरेश गोरड या चार धनगर तरुणांनी उपोषण मागे घेतले.





































