सचिन बर्गे यांच्यासह मान्यवरांचा आमदार महेश शिंदे गटात प्रवेश
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरात सुमारे ४०० कोटी रुपयांहून अधिकची विकासकामे सुरु आहेत. सर्वसामान्य जनतेला अपेक्षित अशी विकासकामे केली जात असल्याचे पाहून प्रभावीत झालेल्या माजी नगरसेवक सचिन बाळासाहेब बर्गे, संजय तानाजीराव बर्गे-पाटील, माजी उपसरपंच विलासराव शंकरराव बर्गे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजित विलासराव बर्गे व गणेश येवले यांनी रविवारी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली, त्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी आमदार महेश शिंदे यांनी नजिकच्या काळात कोरेगाव शहराबरोबरच मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार असल्याची ग्वाही दिली.
कोरेगाव शहरातून सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग, खंडाळा-शिरोळ राज्य मार्ग आणि जिहे-कठापूर ते खेड नांदगिरी प्रमुख जिल्हा मार्ग असून, या मार्गांचे ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण केले जाणार असून, त्यासाठी महायुती सरकारने तब्बल ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सातारा जकात नाका परिसरात करण्यात आला. त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. माहेश्वरी भवन येथे शहरवासियांच्यावतीने कोट्यवधी रुपयांचा विकास निधी कोरेगाव शहरासाठी दिल्याबद्दल आमदार महेश शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कोरेगाव शहराला सातारा शहराची शॅडो सिटी बनवायची असून, पाश्चिमात्य देशातील शहरांचा दर्जा या शहराला द्यायचा असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहराचे नेतृत्व करणार्यांनी यापूर्वी केवळ नारळ फोडण्याचे काम केले, विकास निधीचा थांगपता नसताना, केवळ जनतेची भालवण करण्यासाठी नारळ फोडले गेले, मात्र विकासकामे झालीच नाहीत. विकासकामांचा मोठा बॅकलॉग होता, तो भरुन काढण्याची संधी सर्वसामान्य जनतेने २०१९ साली दिली. आम्ही केवळ नारळ फोडत नाही, तर प्रत्यक्षात विकासकामे सुरु करुन सर्वसामान्यांचे हित पाहतो. आज नारळ फोडला म्हणजे काम सुरु झाले पाहिजे, हाच शिरस्ता पहिल्यादिवसापासून ठेवला असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
सर्वसामान्य जनतेने मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्यानंतर अवघ्या काही दिवसात कोरोनासारखे जागतिक संकट समोर आले. या संकटाला सामोरे जात असताना, सर्वसामान्यांचे जीव वाचले पाहिजेत, यासाठी कोविड सेंटर्स आणि हॉस्पिटल्स सुरु केली. त्यामाध्यातून हजारो लोकांचे प्राण वाचविले. त्याचबरोबर लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करुन त्यांच्या संसाराला हातभार लावला, आज हे सांगत असलो तरी ते माझे नैतिक कर्तव्य होते, असे स्पष्ट करुन आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव शहराला मला बदलायचे होते, तसा ठाम निर्धार केला होता. शहराच्या सर्वच प्रभागांमध्ये ठोस आणि दर्जेदार विकासकामे झाली पाहिजेत, जनतेला अपेक्षित असलेली विकासकामे व्हावीत, याकडे कटाक्ष होता. नगरपंचायत निवडणुकीत देखील जनतेने चांगले पाठबळ दिले आणि सत्ता सोपविली. या सत्तेच्या माध्यमातून शहराचे नंदनवन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सातार्यापेक्षा कोरेगाव शहर चांगले बनणार असून, महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे हे शहर बनेल, असा विश्वास व्यक्त केला. तीळगंगा नदी सुशोभिकरण, आझाद चौकातील भाजी मंडई संकुल, जुना मोटार स्टँड आणि शासकीय विश्रामगृहाची उभारणी केली जात असून, निधी नगरपंचायतीकडे वर्ग देखील झालेला आहे. पाश्चिमात्य देशातील इमारतींचा साज या इमारतींना असून, अशा इमारती राज्यात तुम्हाला कोठे पहायला मिळणार नाहीत, इतक्या सुंदर त्या असणार आहेत. एकंदरीत कोरेगाव आता बदलत चालले असून, जनतेचा विश्वास संपादन करुन विकासकामे केली जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आझाद चौकातील भाजी मंडई संकुलामुळे बाधित होणार्या कुटुंबियांना ४० लाख रुपये किंमतीची घरे मिळणार आहेत. विकासकामे करत असताना श्रीमंत माणसे श्रीमंत बनली नाही पाहिजेत, तर गरीब माणसे मोठी झाली पाहिजेत, याकडे आपला कल आहे, त्यादृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
सुनील खत्री म्हणाले की, आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघाला खर्या अर्थाने विकासपुरुष लाभला आहे. त्यांनी विधानसभा सदस्यत्वाची सुत्रे हाती घेतल्यापासून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा चंग बांधला असून, सर्वत्र ठोस आणि दर्जेेदार विकासकामे पूर्णत्वास जात असल्याचा आनंद आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युरोप दौर्यावेळी परदेशातून पाय निघत नव्हता, तेथील जीवनमान बघून, तो परिसर सोडू वाटत नव्हता, ही बाब मी आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी परदेशातील शहरांच्या धर्तीवर कोरेगावची वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. परदेशातील शहरांप्रमाणेच कोरेगावचा विकास झालेला दिसेल, असे निक्षूण सांगितले होते. राज्याचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. सत्तेशिवाय विकास होत नाही, करता येत नाही, हे त्यांनी ओळखले होते. ते जर आमच्याबरोबर आले आहेत, तर सचिन बर्गे, संजय पाटील, विलासराव बर्गे, अजित बर्गे व गणेश येवले यांना आमच्याबरोबर येण्यास काय हरकत आहे. त्यांचे स्वागत आहे. नजिकच्या काळात आणखी बरीच मंडळी विकासाच्या प्रवाहात सामील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राहूल बर्गे म्हणाले की, आमदार महेश शिंदे यांच्या रुपाने स्थानिक भूमिपुत्राला विजयी केल्यामुळेच आज मतदारसंघाचा संपूर्ण विकास होत आहे, हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. विकासकामांमुळे अनेक जण प्रभावीत झाले असून, ते आमच्याबरोबर येत आहेत, ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात संपूर्ण शहराचा आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी जनतेची ताकद मिळत असून, संपूर्ण शहराचा निश्चितपणे कायापालट होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माजी नगरसेवक महेश बर्गे यांनी सचिन बर्गे यांच्या प्रवेशामुळे शहरात चांगली ताकद मिळाली आहे. सचिन बर्गे व उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे व मी असे त्रिकुट संपूर्ण शहराला आणि मतदारसंघाला माहीत आहे. ते आज आमच्याबरोबर आहेत, याचे समाधान आहे. अजून काही मंडळी आमच्याबरोबर येणार आहेत. कोरेगाव शहराची ताकद मोठी असून, नजिकच्या काळात त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सचिन बर्गे यांचा स्वागत कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, संजय पाटील यांचे किरण बर्गे, विलासराव बर्गे यांचे स्वागत बाजार समितीचे माजी संचालक जयंतीलाल बहुआ, अजित बर्गे यांचे स्वागत जयवंत पवार, गणेश येवले यांचा सुनीलदादा बर्गे यांनी स्वागत केले. संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले. बाजार समितीचे संचालक सुनील निदान यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. दीपाली बर्गे यांच्यासह विकास आघाडीचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
आता त्यांनाच अपात्रतेची नोटीस येणार
संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व्हावा, त्याचबरोबर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हावा, सर्वसामान्यांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही मोठ्या प्रयासाने महायुती सरकार मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सत्तेवर आणले. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजितदादा पवार यांची ताकद त्याला मिळाली. आमचे काम पाहून काही जणांना प्रश्न पडला, आपले काय होणार. मग त्यांनी राजकीय पार्श्वभूमी पाहून, केवळ चर्चा रंगविल्या आणि आम्ही अपात्र ठरणार, अशी आवई उठवली. प्रत्यक्षात मात्र आम्ही अपात्र ठरतो की काय, याची वाट बघणार्यांनाच अपात्र ठरवले जाणार असून, त्यांना नजिकच्या काळात नव्हे येत्या काही दिवसात अपात्रतेबाबतची नोटीस येणार असल्याचे सुतोवाच आमदार महेश शिंदे यांनी केले.
जेसीबीतून पुष्पवृष्टी व भव्य मिरवणूक
कोरेगाव शहर ज्या नेतृत्वाच्या सोबत राहिले, त्या नेतृत्वाने मतदारसंघाचेच नेतृत्व केले आहे, हा आजवरचा इतिहास आहे. आज कोरेगावची जनता खुलेपणाने आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी आहे. त्यांनी कोरेगाव शहराचा कायापालट करण्याचा निर्धार केला असून, प्रत्यक्षात विकासकामे पूर्णत्वास आली आहेत. त्यांच्या कामाने प्रभावीत होऊन अनेक दिग्गज मंडळी त्यांच्याबरोबर विकासाच्या प्रवाहात सामील होत आहेत. रविवारी सचिन बर्गे, संजय तानाजीराव बर्गे-पाटील, विलासराव शंकरराव बर्गे, अजित विलासराव बर्गे, गणेश येवले यांच्या प्रवेशानंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. शिंग-तुतार्यांच्या निनादात हा प्रवेशाचा जोरदार कार्यक्रम झाला.






















