‘महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम’
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ना शंभुराज देसाई आपल्या पाटण मतदार संघात अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करीत असून त्यांच्यासमवेत असलेल्या महसूल,कृषी आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश देतानाचे चित्र सध्या पाटण मतदार संघात दिसत आहे.शनिवारी नुकतीच मंत्री देसाई यांनी पाटण मतदार संघातील अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या सांगवड,चोपडी, नाडे या परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात आणि बांधावर जाऊन केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,गणेश भिसे तसेच महसूल,कृषी,आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते
यासंदर्भात मंत्री देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांची शेतात असणारी उभे पिके तसेच मळण्यासाठी काढून ठेवलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अशा नैसर्गिक अडचणीच्या काळात मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार ठामपणे उभे राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करून मंत्री देसाई म्हणाले,अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे यांनी कालच राज्यातील सर्व प्रशासनाला दिले आहेत.मी स्वतः आजच पाटण मतदार संघातील बहुतांशी गावांमध्ये स्वतः जाऊन अतिवृष्टी मुळे भात, सोयाबीन,ऊस यासारख्या उभ्या तसेच मळणी साठी तयार असलेल्या आणि हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान ग्रस्त पिकांची बांधावर जाऊन पाहणी केली.
यावेळी माझ्याबरोबर महसूल,कृषी,तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी होते. अतिवृष्टी चा मोठा तडाका पाटण मतदार संघाला बसला असून तालुक्यातील १३ महसूल मंडलापैकी ११ महसूल मंडलामध्ये ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सध्य परिस्थितीत तालुक्यातील ३२५ पेक्षा जास्त गावे बाधित असून अंदाजे एक हजार ते दीड हजार हेक्टर क्षेत्र बाधित दिसत आहे.त्यासाठी पाटण मतदारसंघात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून महसूल,कृषी आणि जिल्हा परिषद यंत्रणा पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर करीत असून येत्या दोन दिवसांत नुकसानीचा नेमका अंदाज येईल त्यामुळे नेमके किती नुकसान झाले आहे हे स्पष्ट होईल तसेच नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यांना राज्य शासन मदत देण्यासाठी कटिबद्ध असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अन आजीला पाहून गृहराज्यमंत्री उतरले गाडीतून..!
पाटण मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना रस्त्यामध्ये अचानक एका वयोवृद्ध शेतकरी आजीला पाहून मंत्री देसाई यांनी तातडीने आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून ते आपल्या गाडीतून खाली उतरले आणि त्या बाळकाबाई कोळी नावाच्या शेतकरी आजीजवळ जाऊन तिच्या शेतीचे किती नुकसान झाले आहे यांची आस्थेवाईक पणे चौकशी करून तिच्या शेतीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सदर आजीच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश जाग्यावर च दिले.