सातारा : सन २०२०-२०२१ च्या गळीत हंगामात उसतोड करुन नेलेल्या उस बिलाची थकीत रक्कम एफआरपी प्रमाणे न दिल्याने भुईंज येथिल किसनवीर सहकारी साखर कारखाना स्थळी ठीय्या आंदोलन छेडण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांनी जिल्हधिका-यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी अनिल बाबर, विकास मोहिते, राहुल पवार, अरुण कदम, प्रमोद जाधव, अमोल शिंगटे, गिरिष आवळे व पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०२०-२०२१ च्या गळीत हंगामात उसतोड करुन नेलेल्या उस बिलाची थकीत रक्कम एफआरपी प्रमाणे रुपये ५४ कोटी इतकी आहे. गळीत हंगामात उसतोड करुन तब्बल २ वर्षे झाली आहेत. एवढा कालावधी गेला असताना देखिल कारखान्याने शेतकरी वा-यावर सोडुन दिला आहे. वारंवार पाठपुरावा करुन आजअखेर शेतक-याच्या पदरात १ रुपाया देखिल पडलेला नाही. संबधित कारखान्याने उसतोड केलेल्या खातेदाराला १४ दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक असताना आजपर्यंत कारखाना प्रशासन शेतक-यांच्या भावनांशी खेळत आहे. कारखाना व्यवस्थापनाने तात्काळ बैठक घेऊन थकीत एफआरपी बिलाची पूर्ण रक्कम शेतक-यांच्या खात्यावर व्याजासहीत तात्काळ जमा करावी अन्यथा रयत क्रांती संघटनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी भुईंज येथिल किसनवीर साखर कारखाना स्थळावर ठीय्या आंदोलन करतील यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार असेल असा इशारा मधुकर जाधव यांनी दिला आहे.