उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा आदेश ; एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार
नागठाणे :-प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला अतित, ता. सातारा येथील सराईत गुंड गणेश गुलाब कारंडे याला सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सुधाकर भोसले यांनी दिला.
याबाबत अधिक माहिती अशी, बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार गणेश गुलाब कारंडे याच्यावर जबरी चोरी, जुगार, दंगा मारामारी, विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे बोरगाव पोलीस ठाण्याने या गुन्हेगाराविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे सातारा जिल्हयातुन तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्फतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सातारा उपविभाग सातारा यांच्याकडे सादर केलेला होता.
या प्रस्तावाची चौकशी सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी केली होती. यातील गणेश कारंडे हा सर्वसामान्य लोकांचे शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेचे नुकसान करुन गुन्हे करतच होता. त्याच्यावर दाखल गुन्हयांमध्ये त्यास अटक व कायदेशीर कारवाई करुनही तो जामीनावर बाहेर आल्यानंतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होत होता. त्याच्यावर कोणताच धाक न राहिल्याने त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत होती. याबाबत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सुधाकर भोसले यांच्या समोर सुनावणी झाली. त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 अन्वये कारंडे याला सातारा जिल्हयातून एका वर्षासाठी हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
दरम्यान, नोव्हेंबर 2022 पासून 12 उपद्रवी टोळयांमधील 35 इसमांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील 8 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पो.हवा अमित सपकाळ, किरण निकम, दादा स्वामी, प्रशांत चव्हाण बोरगांव पोलीस ठाणे यांनी योग्य पुरावा सादर केला.