वनकुसवडे पठारावर पवनचक्या नियमबाह्य पध्दतीने होत आहेत जमीनदोस्तसर्वसामान्य नागरिक भयग्रस्त
पाटण :- अशिया खंडात नावजलेला वनकुसवडे पठारावरील पवनचक्की प्रकल्पातील अनेक पवनचक्क्या मुदतबाह्य झाल्या कारणाने त्या भंगारात काढल्या गेल्या आहेत. या पवनचक्क्या काढताना सर्व नियम धाब्यावर बसवून पवनचक्की पायथ्याशी कटरच्या साह्याने कापून अक्षरशः जमीनीवर ढासळून आडव्या केल्या जात आहेत. यामुळे एखादा बॉम्बस्फोट झाल्याचा आवाज, भूकंपाच्या लहरी जमीनीत तयार होत असल्याने परिसरातील नागरिक, लहानमुले, पाळीव प्राणी, परिसरातील वन्यजीव प्राणी भयभीत होत आहेत. पवनचक्की चुकीच्या पद्धतीने काढण्याच्या पध्दतीला येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
सरासरी दिडशे टन वजनाची पवनचक्की जमीनीवर ढासळताना एखादा बॉम्बस्फोट झाल्याचा आवाजाने व जमीनीची भुकंपासारखी हालचाल होत असल्याने शेजारील गावातील नागरिक, लहानमुले, पाळीव प्राणी, परिसरातील वन्यजीव प्राणी भयभीत होत आहेत. या बरोबर शेजारील गावातील अनेक घरांच्या भितींना तडे गेले आहेत. गावांसाठी असणाऱ्या पिण्याच्या पाण्यांच्या झऱ्याचे प्रवाह बदलले गेले आहेत. चुकीच्या पद्धतीने पवनचक्की ढासळत असल्या कारणाने येथील नागरिकांच्या जिवीतास व आरोग्यास धोका निर्माण झाला असून पवनचक्की कंपनी, पवनचक्की मालक व भंगार ठेकेदाराच्या अशा मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
२५ वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या संकल्पनेतून प्रदुषण विरहित कमी खर्चात वा-यावर विज निर्मितीचा पर्याय पुढे आला आणी पाटण तालुक्यातील, वनकुसवडे पठारावरील पहिला व अशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प साकारला गेला. सुजलाॅन, वेस्टास अशा नामांकित कंपन्यांनी खाजगी गुंतवणूक दारांना डेव्हलपर्स करुन दिलेला अनेक पवनचक्क्यांची मुदती मुदत बाह्य झाल्या आहेत. यातच पवनचक्की पासून होणारी विज निर्मितीचे दर महाराष्ट्र शासनाने कमी केल्याचे कारण देत पवनचक्कीची दुरुस्ती, नोकर पगार, त्याची देखरेख हि न परवडणारे असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अनेक पवनचक्की मालकांनी स्वमालकीच्या पवनचक्क्या भंगारात विकल्या आहेत. भंगारदार ठेकेदाराने पवनचक्की उतरवण्याचे शासकीय व कायदेशीर सर्व नियम ढाब्यावर बसवून पवनचक्क्या अक्षरशः कटरच्या सह्याने पायथ्याशी कापून जमीनीवर पाडल्या जात आहेत. याचा फटका परिसरातील नागरिकांना बसत असून या पवनचक्क्या जशा कंटेनर, क्रेनच्या सहाय्याने उभ्या केल्या त्याच पध्दतीने त्या उतरवल्या जाव्यात अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.