297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्वाच्या पदाची दिलेल्या जबाबदारीतुन तात्काळ मुक्त करा
सार्वजनिक आरोग्य विभाग नेहमीच टक्केवारी, वसुली, बदल्या-पदोन्नतीत घोडेबाजार, जेष्ठता डावलून पदस्थापना, औषध खरेदीत घोळ अशा या-ना-त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. सध्याही सार्वजनिक आरोग्य विभागाचा कारभार सक्षम असणारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या काळातही अजब प्रकारे सुरू आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे “297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात” होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील स्वच्छ आणि सिनिअर अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारी आणि ज्युनिअर अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागत असल्याची सध्या विदारक वस्तुस्थिती आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
घडलेला प्रकार असा की, सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘एनयूएचएम’ योजनेंतर्गत 297 कोटी रूपयांची औषध खरेदी सन 2013-14, 2014-15 आणि 2015-16 या 3 वर्षांत केली होती. मात्र या 297 कोटी रूपयांच्या औषध खरेदीत घोटाळा झाल्याचे 2016 साली उघड झाले. परिणामी यातील जबाबदार अधिकारी म्हणून ‘एसीबी’ने डॉ. सतीश पवार, डॉ. राधाकिशन पवार, डॉ. सचिन देसाई, डॉ. जोतकर आणि डॉ. वैभवराव पाटील या 5 अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ६ आक्टोबर 2016 रोजी ताब्यात घेतले होते. याची प्राथमिक चौकशी डॉ. भगवान सहाय यांच्या अध्यक्षतेखालील समितीतर्फे महिनाभरातच करण्याचे ठरले. त्या चौकशीत तथ्य आढळल्यास माजी न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली लाचलूचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) चौकशी करण्याची घोषणा त्यावेळचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली होती. तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या निगराणीखाली एसीबीमार्फत करण्याची आग्रही मागणी त्यावेळचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आरोग्य खात्याचे तत्कालीन संचालक डॉ. सतीश पवार, डॉ. राधाकिशन पवार आदींना निलंबित केल्याचे आरोग्य मंत्री सावंत यांनी जाहीर केले होते. मात्र सध्या 297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडे सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) आणि पुणे विभागाचे उपसंचालक अशी महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. सध्या ते संचालक पदासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु त्यांना संचालक पद न देता आहे तेच सहसंचालक आणि उपसंचालक पदही काढून घेण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य विभागातून होत आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
सदरचा 297 कोटींचा औषध खरेदी घोटाळा हा त्यावेळी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चांगलाच गाजला. त्यावेळचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत, तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत हा विषय उपस्थित करत त्यावेळचे आरोग्य मंत्री दिपक सावंत यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच अप्रमाणित औषधांचा साठा आढळल्यानंतर त्याची माहिती एफडीएला न देता तो साठा घेऊन जा, असे विनंती करणारे पत्र संबंधित कंपन्यांना लिहिणाऱ्या वाशिमच्या तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे यांना निलंबित केले होते.
हे ही वाचा स्वयंघोषीत वसुलदारांच्या विरोधात विरोधातील डॉक्टर संजय राऊत, रोहीत पवार आणि ACB च्या दारी
यामध्ये केंद्र शासनाचा निधी असल्यामुळे खरेदीच्या जाहिराती दिब्रुगड, सिक्कीम, जम्मू येथील वर्तमानपत्रात दिल्या गेल्या होत्या. ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेऊन सदरची खरेदी करण्यात आली होती. तर दुसरीकडे औषध खरेदीत 297 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर, या खरेदीसंबंधीच्या सरकारी रेकॉर्डमध्ये गडबड केली जाण्याची किंवा ते नष्ट केले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधीचे सर्व रेकॉर्ड न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले होते. न्यालयाने अॅड. पालोदकर यांची या सुनावणीत ‘ॲमायकस क्युरी’ म्हणून नेमणूक केली होती. ॲड. पालोदकर यांनी या याचिकेत केलेल्या अर्जाची दखल घेऊन खंडपीठाने सर्व मूळ रेकॉर्ड 1 नोव्हेंबर 2016 पर्यंत न्यायालयाच्या निबंधकांकडे (न्यायिक) जमा करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय औषध खरेदी आणि त्यांचे वितरण यात झालेल्या अनियमितता, बेकायदेशीरपणा होत असल्याचा ज्या अधिकाऱ्यांवर संशय आहे, अशा अधिकाऱ्यांना औषधांची खरेदी, पुरवठा आणि निविदाप्रक्रिया आदी संबंधित कामांपासून सरकारने दूर ठेवले होते. तसेच त्यांचा रेकॉर्डशी संबंध येणार नाही, याचीही सरकारने खात्री करण्याचे खंडपीठाने नमूद केले होते. असे औषध खरेदीचे प्रकरण सुरू असताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून यातील डॉ. राधाकिशन पवार यांच्यावर पुन्हा मोठ-मोठ्या पदांची जबाबदारी का देत आहेत ? आहे ती पदे काढून घेतली जाणार का ? 297 कोटींच्या औषध खरेदीची फाईल पुन्हा ओपन केली जाणार का ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनता आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत.