महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (अनिल गायकवाड)
सातारा, दि. ३० मार्च : दरवर्षी मार्च महिन्यात उन्हाचे चटके बसू लागतात, तर कमाल तापमानाचा पारा एप्रिलमध्ये चाळिशी गाठतो. मात्र, यंदा मार्चच्या शेवटच्या आठवडय़ातच राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर गेला आहे. पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट येणार असून अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेने अबालवृद्धांसह नागरिक अक्षरशः हैराण झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. उष्णतेच्या लाटेपासून स्वत: चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी कामा व्यतिरिक्त सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.
यंदा २१ ते २४ मार्च आणि २८ ते ३१ मार्च या कालावधीत दोन उष्णतेच्या लाटा नोंदवल्या जातील, असा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. बुधवारपासून शनिवापर्यंत राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सक्रिय होत असून, सध्या मुंबईसह कोकण वगळता बहुतांश भागात सरासरी कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास गेले आहे. जिल्ह्यातील तापमान ३९ ते ४० अंश सेल्शियस पर्यंत गेले आहे. हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्राने मंगळवारी ३६ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्राने ३३.१ अंश कमाल तापमानाची नोंद केली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांना उष्ण लाटेचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात ३० मार्च, १ आणि २ एप्रिल, नगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि अकोला या जिल्ह्यांत ३० व ३१ मार्च आणि १ व २ एप्रिल, अमरावती, बुलढाणा ३० आणि ३१ मार्च, चंद्रपूर ३१ मार्च, नागपूर ३० मार्च या कालावधीत उष्णतेची लाट तीव्र जाणवेल.
मार्च महिन्यातच राज्याचा पारा सरासरी ४१ अंशांवर गेल्याने यंदा मोसमी पाऊस वेळेवर येण्याची शक्यता आहे. कमाल तापमानाचा पारा विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी येथे ४३ ते ४६ अंशांपर्यंत पोहोचला असून, रायगडमधील भिरा येथेही विक्रमी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्येही कमाल तापमान वाढणार आहे