जगदीश जगताप : स्वत:ची कृष्णकृत्ये लपविण्यासाठीच विरोधकांकडून खोटे आरोप
कराड, ता. २५ : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या चेअरमनपदाच्या कार्यकाळात २९० सभासदांची नोंदणी बोगस पद्धतीने केल्याचा ठपका आहे. या सभासदांनी आपले सभासदत्व सिद्ध करण्यासाठी योग्य ती कागदपत्रे सादर करावीत, यासाठी कारखाना प्रशासन गेले दीड वर्षे पाठपुरावा करत आहे. पण यातील अनेकांनी अद्यापही योग्य कार्यवाही केलेली नसल्याने, सहकार खात्यामार्फत अविनाश मोहिते यांच्या कार्यकाळातील बोगस नोंदणीबाबत चौकशीही सुरू झालेली आहे. यापासून सभासदांचे लक्ष परावृत्त करण्यासाठी आणि सभासदांच्या डोळ्यांत निव्वळ धूळफेक करण्यासाठी संस्थापक पॅनेलचे प्रमुख प्रशांत पवार यांनी कारखान्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा बनाव रचला आहे. मुळात ज्या प्रकरणाची चौकशी सहकार खात्यामार्फत सुरू आहे आणि जो विषय सहकार खात्याच्या अखत्यारित आहे, त्याबद्दल पोलिसांत तक्रार करणे म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट असून, तो चोराने उलट्या बोंबा मारण्याचाच प्रकार आहे, अशी टीका कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी केली.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात श्री. जगताप यांनी म्हटले आहे, की संस्थापक पॅनेलचे प्रमुख प्रशांत पवार यांनी कृष्णा कारखान्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० पेक्षा जास्त व्यक्तींना सभासद देण्यात आल्याचा आक्षेप घेत, याबाबत चौकशी करण्याच्या मागणीचा अर्ज कराड पोलिस स्थानकात दिला आहे. मुळात जी बाब सहकार खात्याच्या अखत्यारित आहे, त्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करायला जाणे म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे. वास्तविक अविनाश मोहिते यांच्या कार्यकाळात कुणाच्या इशाऱ्याने कारखाना चालविला जात होता, याची चांगलीच माहिती प्रशांत पवार यांना आहे. याच काळात २९० लोकांना बोगस कागदपत्रांच्या आधारे कारखान्याचे सभासदत्व दिल्याचे समोर आले आहे. यातील अनेक लोकांकडे कारखाना प्रशासनाने गेल्या दीड वर्षापासून पत्रव्यवहार करून, कागदपत्रांची रितसर मागणी केलेली आहे. पण यातील अनेकांकडून कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. दरम्यान, याबाबतची तक्रार सहकार खात्याकडे दाखल झाली आहे. त्याबाबत चौकशीही सुरू आहे. स्वत:च्या पॅनेलच्या कार्यकाळातील सभासद अपात्र ठरल्यास स्वत:च्या बोगसपणावर शिक्कामोर्तब होईल, याची भिती वाटू लागल्यानेच संस्थापक पॅनेलने मार्च २०१६ ते ऑगस्ट २०१८ या काळात नोंदविलेले सभासद बनावट असल्याची खोटी आवई उठविण्यास प्रारंभ केला. याबाबत त्यांनी अगोदरच सहकार खात्याकडे तक्रार केली असून, त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन सहकार खाते याबाबतची पडताळणी करत आहे. पण त्यांचा निवाडा येण्याअगोदरच संस्थापक पॅनेलचे प्रशांत पवार यांनी पोलिसांत धाव घेणे म्हणजे हास्यास्पद आहे.
कृष्णा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्याकडे केलेल्या मागणीनुसार कायदेशीरपणे व योग्य त्या कागदपत्रांच्या आधारे कारखान्याचे सभासदत्व देण्यात आले आहे. सहकार खात्यावर आमचा विश्वास असून, ते योग्य निवाडा देतील आणि त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना लाभ होईल, याचीही आम्हाला खात्री आहे.
वास्तविक प्रशांत पवार यांनी ज्या काळातील सभासदांच्या नोंदणीबाबत आक्षेप घेतला आहे, तो काळ मार्च २०१६ ते ऑगस्ट २०१८ हा आहे. माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्यासह संस्थापक पॅनेलचे ५ संचालक आत्ताच्या संचालक मंडळात आहेत. संचालक मंडळाच्या १९ बैठकांत सभासद नोंदणीचा हा विषय आला होता, असे खुद्द तक्रारदार प्रशांत पवार यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. मग या १९ बैठकांच्यावेळी त्यांच्या पॅनेलच्या संचालकांनी याबाबत आक्षेप का नोंदविला नाही? या बैठकांना त्यांनी दांडी मारली होती की बैठकीत ते झोपा काढत होते, असा सवाल जगदीश जगताप यांनी उपस्थित केला आहे.
निवडणुका तोंडावर आल्याने स्वत:ची कृष्णकृत्ये लपविण्यासाठी विरोधकांकडून असले माकडचाळे यापुढेही सुरू राहणार आहेत. त्यामुळे सभासदांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता, त्याकडे दूर्लक्ष करावे असे आवाहनही श्री. जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.