सातारा
राज्यात गाजत असलेल्या सातारा येथील न्यायाधीश धनंजय निकम व त्यांच्या सहकाऱ्यांवरती पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याची शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी बचाव पक्ष आणि सरकारी पक्ष यांचा जोरात युक्तिवाद झाला. यावेळी धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयात फेटाळण्यात आला.
सातारा येथे ११ डिसेंबर रोजी न्यायाधीश धनंजय निकम व इतर सहकाऱ्यांवरती एका प्रकरणामध्ये जामीन देण्यासाठी लाचेची मागणी झाल्याची तक्रार पुणे येथे दाखल झाली होती. त्यावेळी या विभागातील अधिकाऱ्यांनी सातारा येथे सापळा रचून चारही संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. जामीन अर्जाबाबत मदत आणि तो मंजूर करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग तीन धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात फेटाळण्यात आला. शुक्रवारी याप्रकरणी सरकार पक्ष आणि बचाव पक्षातर्फे युक्तीवाद झाला. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज करण्यात आला होता.
जिल्हा न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्यासमोर शुक्रवारी सरकार पक्ष आणि बचाव पक्षाच्यावतीने युक्तीवाद करण्यात आला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला. लाच मागणी प्रकरणातील आॅडिओ रेकाॅर्डिंगमध्ये घटनेचा उल्लेख आहे. आवाजाचे नमुने घेण्यासाठी न्यायाधीश धनंजय निकम यांना ताब्यात घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे व इतर दोन आरोपींमध्ये मागील सहा महिन्यांत जवळपास ९ तास संभाषण झालेले आहे. त्यांचा मोबाइल जप्त करायचा आहे. न्यायाधीश हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. ते न्याय देतात. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये, असा युक्तीवाद जिल्हा सरकारी वकील कुलकर्णी यांनी केला. तसेच बचाव पक्षाच्यावतीने अॅड. विकास पाटील-शिरगावकर यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.आर.जोशी यांनी न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.