पुणे : भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), पुणे यांनी त्यांच्या 78 व्या स्थापना दिना निमित्त मानक महोत्सवाचे आयोजन हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल, हिंजवडी, पुणे येथे केले. या कार्यक्रमात उद्योग, शैक्षणिक संस्था आणि चाचणी प्रयोगशाळांचे 150 हून अधिक प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेतला.
श्री एस.डी. राणे, शास्त्रज्ञ-ई आणि संचालक, बीआयएस पुणे, यांनी सर्व सहभागी आणि मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात केली.
कार्यक्रमाला पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. अनिल कुमार राजवंशी, संचालक, निंबकर कृषी संशोधन संस्था, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. राजवंशी यांनी तंत्रज्ञानातील नवकल्पना यांच्यामार्फत शाश्वत विकासाचे महत्त्व आणि ते साध्य करण्यासाठी मानकांची भूमिका यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली. या सत्रांमध्ये मानकांचा अवलंब करून शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना कसे गती मिळू शकते यावर चर्चा झाली. नवकल्पना आणि अवसंरचना यांची शाश्वत आणि सुदृढ औद्योगिक विकासाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे विचार मांडले गेले.
याशिवाय, कार्यक्रमात मानकीकरण, उत्पादन प्रमाणपत्रे, गुणवत्ता नियंत्रण आदेश (क्यूसीओ) आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) दिल्या जाणाऱ्या सवलती यांची माहिती देण्यात आली. या चर्चांमध्ये बीआयएसने उद्योगांना, विशेषतः एमएसएमईंना, अनुपालन साध्य करण्यात आणि त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप औपचारिक आभार प्रदर्शनाने झाला, ज्यामध्ये सर्व मान्यवर, वक्ते आणि सहभागींचे त्यांच्या अमूल्य योगदानासाठी आभार मानले गेले. या कार्यक्रमाला यशस्वी बनवल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.