आपच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन
सातारा: राज्यात कोरोना संकटाबरोबरच परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. आर्थिक संकटाचा सामना करणार्या शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आपचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात पावसाची सुरवात झाल्यानंतर शेतकर्यांनी सोयाबीनची पेरणी केली आणि मोठ्या प्रमाणात सोयाबीनची उगवण झाली नाही.
याबाबत राज्यभर तक्रारी आल्यानंतर बियाणे व त्याच्या कंपन्यांची चौकशी करण्यात आली होती आणि बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे उगवण शक्ती कमी होती, त्यामुळे शेतकर्याला दुबार पेरणी करावी लागली, हे सत्य आहे. त्यानंतर अनेक भागात दुबार पेरणी झाली, सोयाबीन सोबतच मुग, उडीद हे पिके बर्यापैकी आले होते, परंतु यावर्षी गेल्या दोन महिन्यात जोरदार वादळी पाऊस होत असल्यामुळे शेतकर्यांच्या हातात आलेली पिके कापणी करण्यापूर्वी खराब झाली आहेत. सध्याच्या परिस्थितीत राज्य शासनाने शेतकरी वर्गाला तात्काळ दिलासा देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, प्रती हेक्टर दिल्ली सरकार प्रमाणे 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, कपाशीचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत.
सोयाबीन, धान व कपाशी खरेदी हेतू सरकारी यंत्रणा उभी करावी, मिनिमन सपोर्ट प्राईस नुसार सरकारी खरेदी चालू करावी, पूर्व विदर्भात मानव निर्मित पूरामुळे झालेल्या नुकसानभरपाई कोकणाप्रमाणे मदत करण्यात यावी, राज्यात जेथे जेथे फळबागांचे नुकसान झाले आहे, तेथे पंचनामेकरून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा व इतर भागात सोयाबीन वर येलो मोजाक नावाची कीड आल्यामुळे सोयाबीनला लागलेल्या शेंगा भरल्याच नाहीत हे वास्तविकता आहे. विदर्भ व मराठवाडा या भागात सोयाबीनचे उत्पादनचे (उतार) प्रमाण ही निम्म्यापेक्षा कमी येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र इत्यादी भागातील कपाशीचे बोंड (पिक) सडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विदर्भातील संत्रा पिकाचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मानव निर्मित पूर आल्यामुळे शेतकर्यांची पिके पाण्याखाली आली होती, तसेच गावातील नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांनाही पूर्ण पणे मदत मिळालेली नाही. जेथे मिळाली ती फारच तुटपुंजी आहे. एकूणच राज्यातील शेतकर्यांची परिस्थिती विदारक आहे. त्यामुळे सरकार कडून शेतकर्यांना मदत मिळणे अतिशय गरजेचे आहे, असेही या निवेदनामध्ये नमुद करण्यात आले आहे. यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष संदिप जगताप, जिल्हा सचिव महेंद्र बाचल, सहसचिव तात्या सावंत, खजिनदार विजयकुमार धोतमल आणि पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर व आपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते