संतोष भोसले
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी, वडगाव निंबाळकर
कोरोना संसर्गाविरोधात सर्वांचीच लढाई सुरू आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात नागरिकांना मोफत होमिओपॅथिक औषधे वाटप करून ‘बारामती’ तील डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सध्या सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मृत्यूदर कमी असला तरी कोरोनाला रोखायचे कसे? शिवाय, शहरांसह गाव-खेड्यांमध्ये देखील आता कोरोनाचा शिरकाव होत आहे. कोरोनावर औषधोपचार उपलब्ध नसल्याने आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे. त्याच पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकरचे ग्रामविकास अधिकारी शहानुर शेख यांच्या संकल्पनेतून बारामतीतील डाॅ.शशांक जळक, डाॅ.अमोल भंडारे, डाॅ.शफिक मुजावर यांनी वडगाव निंबाळकर गावातील एक हजार सातशे कुटुंबांना होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम ३० हे औषध मोफत वाटप करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. गावामध्ये कोरोना योद्धे म्हणून काम करत असलेले ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत संपूर्ण गावठाण आणि वाड्यावस्त्यांवर घरोघरी हे रोगप्रतिकारक औषधाचे वितरण करण्यात येणार आहे. नुकताच या औषध वाटपाचा शुभारंभ सरपंच आकांक्षा शिंदे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेले औषध मोफत उपलब्ध करून देणा-या डाॅक्टरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच माणिक गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सुनिल ढोले, रोहिदास हिरवे, धैर्यशील राजेनिंबाळकर, अजित भोसले, शिवाजी लोणकर, ग्रामविकास अधिकारी शहानुर शेख आदी उपस्थित होते.