महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / कोरेगाव :
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील वनपाल संदीप प्रकाश जोशी (वय 37 वर्षे ) वनपरिमंडल अधिकारी याला दि 18( गुरुवार ) रोजी 57400 रुपयाची लाच घेताना सातारा येथे रंगेहात पकडले. तसेच लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले म्हणून वनरक्षक श्रीमती नम्रता भुजबळ (रा. नागझरी ता. कोरेगाव) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतातील तोडलेल्या 717 झाडांचे घनमीटर वाहतुकीचा परवाना देण्यासाठी वनपाल जोशी यांनी रु 57400 रुपयाची मागणी केली यावेळी वनरक्षक भुजबळ याही त्याठिकाणी उपस्थित होत्या. तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा करून सातारा वनविभाग कार्यालयाच्या कंपाऊंड मध्ये सापळा रचून रु 57400 लाच घेताना वनपाल संदीप जोशी यांना रंगेहात पाडण्यात आले.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती सुषमा चव्हाण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, सातारा लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.