महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी: फलटण
पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, हवेली ,दौंड, वेल्हे ,आंबेगाव या तालुक्यातील 130 ग्रामपंचायतीची मुदत 20 ऑगस्ट 20 अखेर संपल्याने त्या ठिकाणी 130 प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या नियुक्त्या केल्या असून त्याची यादी प्रसिद्धीस दिली आहे. त्यानुसार 21 ऑगस्ट 20 पासून प्रशासकांनी प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारावयाचा आहे.
ज्या दिवशी विधिग्राह्य गठीत झालेली ग्रामपंचायत अस्तित्वात येईल त्या दिवसापासून प्रशासक पद व प्रशासकाच्या अधिकार संपुष्टात येणार आहेत. ज्या व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येईल अशा व्यक्तीकडून आपली कर्तव्य पार पाडताना गैरवर्तणूक किंवा लांच्छनास्पद वर्तणूक आढळल्यास किंवा कर्तव्यात दुर्लक्ष झाल्यास झाल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासकास पदावरून दूर करण्याचा अधिकार कार्यकारी अधिकारी यांना आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 151 मधील पोटकलम 1 मध्ये खंडातील(क) मध्ये करण्यात आलेल्या तरतुदी नुसार या नेमणुका करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये बारामती 5 , पुरंदर 29, हवेली 47 , दौंड 26 , वेल्हे 13 , आंबेगाव 10 अशा ग्रामपंचायतीचा समावेश आहे