महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी (फलटण ): प्रतापसिंह भोसले
महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय,पुणे येथे अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विवेक फत्तेसिंग घाडगे, राजाळे ता.फलटण जि.सातारा या विद्यार्थ्याने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत (RAWE) श्री. धर्मराज जगन्नाथ यजगर पाटील यांच्याशी संवाद साधून, शेती व्यवसायातून सुद्धा आपले करिअर घडवता येते, याची माहिती घेतली.
त्यांना शेती व्यवसायाची आवड कशी निर्माण झाली असे विचारले असता श्री. धर्मराज जगन्नाथ यजगर पाटील यांनी असे सांगितले की माझे B.Sc.Agri. चे शिक्षण झाल्यानंतर मी गावाकडे आलो व नोकरीच्या शोधात होतो. त्याच्यानंतर मला महिना रु.40000 पगाराची नोकरी मिळाली परंतू त्या नोकरीमध्ये मन रमत नव्हते कारण माझे शिक्षण कृषि पदवीधराचे असुन व मला 12 एकर बागायत जमीन असुन माझ्या शिक्षणाचा काहीच उपयोग होत नाही व माझ्या वडिलांना सर्व गावकरी मंडळी बागायतदार म्हणून चिडवत असत, मला सुद्धा “या बागायतदार” असे हिणवत असत, याचाच मला धक्का बसला की 12 एकर बागायतदार जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न किती असावे? याचा मी अभ्यास केला अणि नोकरीचा राजीनामा देऊन शेती व्यवसायाकडे वळलो.
आमचे वडिल आजपर्यंत पारंपरिक पध्दतीने शेती करित होते, त्याचाच हा परिणाम असल्यामूळे आमचे वार्षिक उत्पन्न समाधानकारक मिळत नव्हते. मी शेती व्यवसायामधे झोकून दिल्या नंतर माझ्याच घरातून मला विरोध जाणवायला लागला; “आम्ही आयुष्यभर शेती केली त्यात कोणीही आजतागायत म्हणावे असा यशस्वी झाला नाही, तरी तू हा व्यवसाय करु नको कारण शेती हा व्यवसाय पावसावरील जुगार आहे” तसेच शेतीतून उत्पन्न झालेल्या मालाची किंमत ठरवणे शेतकर्याच्या हातात नाही, असे त्यांचे म्हणने होते.
मी कृषी पदवीधर असल्यामूळे मला त्यांच्या पारंपरिक पध्दतीने करणार्या शेती व्यवसायाबद्दल त्यांचे म्हणणे योग्य आहे असे पटले, परंतु त्याच्यावर सुद्धा पर्याय असू शकतात ते म्हणजे असे, आजच्या बदलत्या परिस्थितीनुसार पारंपरिक शेती करण्याचा काळ नाही; त्याच्यासाठी शेती करीत असताना हवामान, पर्जन्यमान, बाजारभाव, मागणी व पुरवठा तसेच पाण्याचे नियोजन आणि सुधारीत पध्दतीने बि-बियाणे, खते-औषधे या सर्व गोष्टींचा मी अभ्यास करुन व्यवसाय करण्यास सुरुवात केली. जुन्या पध्दतीने आमचे 12 एकर बागायत शेतीमध्ये वार्षिक उत्पन्न फक्त रु.1,00,000 होते.
मी पहिल्यांदा सर्व क्षेत्रामध्ये एकच पीक न घेता दोन ते तीन पिके घेण्याचा विचार केला (ऊस, गहू, भाजीपाला) असे केले असता माझे दोन ते तीन वर्षांमध्ये वार्षिक उत्पन्न रु. पाच ते सहा लाखांवरती गेले. त्यानंतर मला शेतीविषयक खुप आवड निर्माण झाली, त्यानुसार वेगवेगळ्या पिकांसंबंधी प्रात्यक्षित माहिती असणाऱ्या शेतकरी व कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन अजून सुधारित पध्दतीने शेतीचे नियोजन करुण समाज्याच्या गरजेनुसार शेतीत पिके घेऊ लागलो उदा. मिर्ची, टोमेटो, कोबी, फळबाग, फलशेती अशा सुधारीत पद्धतीने मी शेती केल्यामुळे आजपर्यंत आमच्या शेती प्लँट वर पाण्याचं नियोजन, शेतीचा पोत, यातून आम्ही यशस्वी शेती कशी केली? हे पाहण्या साठी इज्राईल देशाचे शेती विषयक अभ्यास करणारे शिस्टमंडळ यांनी भेट दिली. शिवाय इतर सामाजिक कार्य करणार्या संस्था, शेतकरी, बागायतदार यांनी भेटी दिलेल्या आहेत. या शिवाय ‘ऑल इंडिया रेडिओ’ केंद्रावर गहू पिकातील व्यवस्थापना बाबत आमची मुलाखत झाली आहे.
आजच्या सुशिक्षीत पदवी संपादन केलेल्या मुलांनी फक्त UPSC व MPSC स्पर्धा परीक्षेच्या मागे न लागता आपले करियर घडवण्या करीता शेती क्षेत्राची निवड करावी. कारण आपण आता पाहतोय की कोरोनाच्या काळामधे शेती हाच व्यवसाय सुरू होता, बाकी सर्व व्यवसाय व उद्योगधंदे पुर्ण लॉकडाउन च्या कचाट्यात बंद होते. तरी आजच्या या युगामध्ये सर्व क्षेत्रामधे जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. म्हणून तुम्ही स्वत:शीच स्पर्धा करण्यास सक्षम पाहीजे. म्हणजे एखाद्या व्यवसायामधे अपयश आल्यानंतर खचून न जाता नव्या जोमाने पुन्हा कामाला सुरुवात केली पाहीजे. म्हणजे तुम्हाला माझ्या सारखे एक ना एक दिवस शेती व्यवसायामधे यश मिळाल्याखेरिज राहणार नाही. हा माझा अनुभव आहे. कोरोनाच्या काळामधे रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लागणार्या फळांपैकी आम्ही आता आमच्या शेतामधे ड्रेगन फ्रुट या फळांची सहा एकरी लागवड केली आहे. आता आम्ही या टप्प्यात आहोत की शेती विषयक ज्ञान हे फक्त स्थानिक भागामधे एकवटून न राहता ते देशपातळीवर किंबहुना जगाच्या कानाकोपर्यात पोहोचावे या अनुशंगाने ‘लैंडलॉर्ड’ नावाचे कृषिविषयक ऐप तयार करीत आहोत. या ऐप मधे शेतीविषयक सर्व प्रकारचे सल्ले, हवामाना पासून ते बाजार भावापर्यंत अशी माहिती पुरविणार आहोत.
या कार्यक्रमासंबंधी लागणारे मार्गदर्शन कृषिदूत विवेक फत्तेसिंग घाडगे याने कृषि महाविद्यालयातील डॉ. ऋषिकेश सोनवणे सर यांच्याकडून घेतले. त्याच प्रमाणे एकुण ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम पार पाडण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. आर.ए.कारंडे, केंद्र प्रमुख डॉ. बी.बी.पाटील तसेच कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.